breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

दुहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपीची फाशी रद्द

पोलिसांनी योग्य तपास न केल्याचा ठपका

अयोग्य तपास आणि पोलिसांनी आरोपींविरोधात आवश्यक ते पुरावे गोळा केले नसल्याचा ठपका ठेवत दुहेरी हत्येप्रकरणी नाशिक येथील रामदास शिंदे याला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली. ३२ वर्षांच्या महिलेसह तिच्या सहा वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याच्या आरोपाखाली सत्र न्यायालयाने शिंदे याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती.

शिंदे याने शिक्षेविरोधात केलेले अपील न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने मान्य करत त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य सरकारने केलेली याचिका फेटाळून लावली. गेल्या वर्षी २६ एप्रिलला नाशिक सत्र न्यायालयाने शिंदे याला त्याच्यावरील सगळ्या आरोपांमध्ये दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला शिंदे याने अ‍ॅड्. अनिकेत निकम यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृत महिला ही आपल्या सहा वर्षांच्या मुलासह शिंदे याच्या वडिलांच्या मालकीच्या जागेत भाडेतत्त्वावर राहत होती. पत्नी आणि मुले घरात नसताना शिंदे हा त्या महिलेच्या घरी गेला होता. त्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिकार केल्याचा राग मनात ठेवून शिंदे याने तिची आणि तिच्या मुलाची निर्घृण हत्या केली. या महिलेच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर चाकूच्या हल्ल्याच्या २४, तर तिच्या मुलाच्या शरीरावर २८ जखमा आढळून आल्या. हत्या केल्यानंतर शिंदे याने आपल्या एका मित्राशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला आणि त्याच्याकडे गुन्ह्याची कबुली दिली, असा दावाही पोलिसांतर्फे अपिलाच्या वेळी सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी केला होता.

परंतु पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य तपास केलेला नाही. तपासात आणि पुराव्यांत अनेक त्रुटी आहेत. तसेच पोलीस पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यांवर अवलंबून होते. मात्र पुराव्यांच्या साखळीद्वारे आरोप सिद्ध करण्यात पोलीस अपयशी ठरल्याचा दावा शिंदे याच्यातर्फे करण्यात आला. शिवाय रक्ताने माखलेले शिंदे याचे कपडेही पोलिसांनी सत्र न्यायालयासमोर सादर केलेले नाहीत. शिंदे याने ज्या मित्राकडे गुन्ह्याची कबुली दिली, त्या मित्राने सत्र न्यायालयासमोरील साक्षीच्या वेळी घूमजाव केल्याचेही निकम यांनी अपिलावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. शिंदे याच्या युक्तिवादाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे स्पष्ट करत पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केला नाही आणि आरोपीविरोधात आवश्यक ते पुरावे गोळा केले नसल्याचा ठपका ठेवला. तसेच शिंदे याला दुहेरी हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशी रद्द करत त्याची सुटका केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button