आमदार महेश लांडगे यांना “ पिंपरी-चिंचवड समाज भूषण’ पुरस्कार

“प्रोग्रेसिव्ह’ची घोषणा : वसंत व्याख्यानमालेत होणार वितरण
पिंपरी– शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या प्रोग्रेसिव्ह एज्यूकेशन सोसायटीच्या वतीने दिला जाणारा “पिंपरी-चिंचवड समाज भूषण’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदा भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांना हा जाहीर झाला आहे. फुलगांव आश्रम येथील प. पू. स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
प्रोग्रेसिव्ह एज्यूकेशन सोसायटी, पुणे संचलित निगडी-यमुनानगर येथील मॉडर्न शैक्षणिक संकूलात येत्या रविवारी, दि.23 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे वसंत व्याख्यानमालेचा सांस्कृतिक उपक्रमही सुरु आहे. यामध्ये दिलीप हल्याळ, स्मिता ओक, प्रकाश ऐदलाबादकर, विश्वास मेहेंदळे, मिलिंद जोशी, गणेश शिंदे, माणिक गुट्टे, प्रा. अरुण घोडके आदी मान्यवर विविध विषयांवर विचारमंथन करणार आहेत.
आजपर्यंतच्या पुरस्काराचे मानकरी…
प्रोग्रेसिव्ह एज्यूकेशन सोसायटी, पुणे संचालित मॉडर्न शैक्षणिक संकुलाच्या वतीने 2004 पासून प्रतिवर्षी “पिंपरी-चिंचवड समाजभूषण’ दिला जातो. यामध्ये आजपर्यंत डॉ. पी. डी. पाटील, डॉ. रामचंद्र देखणे, कांतीलाल खिंवसरा, व्ही. एस. काळभोर, गिरीश प्रभुणे, ह. भ. प. मंगलाताई कांबळे, लक्ष्मण जगताप, विलास लांडे, गोविंद घोळवे, श्रीरंग बारणे, अमर साबळे या दिग्गजांना “पिंपरी-चिंचवड समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
रौप्य महोत्सवी व्याख्यानमाला…
सांस्कृतिक समाजप्रबोधनात्मक उपक्रमांतर्गत “प्रोग्रेसिव्ह’ संस्थेच्या वतीने वसंत व्याख्यानमाला सुरु करण्यात आली आहे. यंदा ही व्याख्यानमाला रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. सन 1991 पासून समाजप्रबोधनात्मक उपक्रमांचा प्रारंभ संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी विनामूल्य खुले व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. प्रथम तीन दिवस, त्यानंतर उपकार्यवाह शरद इनामदार यांच्या पुढाकाराने ही व्याख्यानमाला सात दिवसांची करण्यात आली. आजवर या व्याख्यानमालेत ह. भ. प. बाबामहाराज सातारकर, शरद तळवळकर, प्रा. शिवाजीराव भोसले, राहुल सोलापूरकर, द. मा. मिरासदार, विठ्ठल वाघ, निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे, विजय कुवळेकर, अविनाश धर्माधिकारी, विवेक वेलणकर, डॉ. रामचंद्र देखणे आदी प्रतिभावान लोकांनी मार्गदर्शन केले आहे.