breaking-newsआंतरराष्टीय

मोदी यांच्याशी चर्चेस तयार!

उभय देशांतील सलोख्यासाठी इम्रान खान यांचा पुढाकार

आपले भारतीय समपदस्थ नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणी करण्यास आपण तयार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी सांगितले. आपल्या भूमीवरून दहशतवादी कारवाया होऊ देणे आपल्या देशाच्या हिताचे नाही, ही गोष्ट त्यांनी मान्य केली.

पाकिस्तानने सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया थांबवल्याशिवाय त्या देशाशी चर्चा करण्याची शक्यता परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ठामपणे नाकारल्यानंतर दुसऱ्या दिवशी खान यांनी हे वक्तव्य केले आहे.

खान यांच्या सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी गुरुवारी भारतीय पत्रकारांच्या एका गटाशी येथे संवाद साधला. पाकिस्तानच्या भूमीचा इतर ठिकाणी दहशतवादी कारवाया करण्यासाठी उपयोग होऊ देणे आमच्या हिताचे नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. पाकिस्तानच्या लोकांना भारतासोबत शांततेचे संबंध हवे असून, आपल्याला मोदी यांना भेटायला आणि त्यांच्याशी कुठल्याही मुद्यावर बोलायला आवडेल, असे खान म्हणाले.

मी कुठल्याही मुद्यावर बोलणी करण्यास तयार आहे. काश्मीरच्या मुद्यावर लष्करी तोडगा असू शकत नाही, असे मत खान यांनी व्यक्त केले. काश्मीरचा प्रश्न सोडवणे शक्य आहे काय असे विचारले असता, ‘काहीही अशक्य नाही’, असे उत्तर खान यांनी दिले. लोकांची मानसिकता बदलली आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली. नवी दिल्लीकडून सकारात्मक संकेत मिळण्यासाठी आम्ही भारतातील यानंतरच्या सार्वत्रिक निवडणुकांची वाट पाहण्यास तयार आहोत, असेही इम्रान यांनी सांगितले.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दवाचा प्रमुख हफीझ सईद याला शिक्षा करण्याच्या मुद्याबाबत विचारले असता खान म्हणाले, की सईदविरुद्ध संयुक्त राष्ट्रांचे र्निबध आहेत. त्याच्यावर यापूर्वीच नजर ठेवण्यात येत आहे.

‘बहुतांश भारतीयांकडून कौतुक’

इस्लामाबाद : शीख समुदायाच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीनुसार कर्तारपूर साहेब मार्गिका बांधण्यासाठी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांनी उचललेल्या पावलांचे भारतातील बहुतांश लोक कौतुक करतील याची मला खात्री आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी सांगितले. या बहुप्रतीक्षित मार्गिकेचे भूमिपूजन खान यांनी पाकिस्तानातील कर्तारपूर येथे बुधवारी एका भव्य कार्यक्रमात केले होते. जो भारत मला ठाऊक आहे, तेथील बहुतांश लोक नक्कीच या गोष्टीचे कौतुक करत असतील, असे खान यांनी पत्रकारांना सांगितले.  भारताने या मार्गिकेचा प्रस्ताव २० वर्षांपूर्वी पाकिस्तानपुढे ठेवला होता. या मार्गिकेचे बांधकाम सहा महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

कर्तारपूर मार्गिकेमुळे सलोख्याची सुरुवात -मेहबूबा

कर्तारपूर मार्गिका ही भारत व पाकिस्तानदरम्यान सलोख्याची ‘नवी सुरुवात’ ठरू शकेल, असे मत जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी गुरुवारी व्यक्त केले. सीमा ‘अप्रासंगिक’ ठरवण्यासाठी दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापार आणि लोकांचा परस्पर संपर्क घडवून आणावा, असे आवाहनही त्यांनी केले. आपण आपल्या सीमा बदलू शकत नाही, पण लोकांचा एकमेकांशी संपर्क घडवून आणून आणि व्यापाराला प्रोत्साहन देऊन त्या अप्रासंगिक ठरवू शकतो. ही भारत व पाकिस्तान या दोघांसाठीही शांतता आणि विकास यांची सुरुवात ठरेल, असे मेहबूबा यांनी एका ट्वीटमध्ये लिहिले. नियोजित कर्तारपूर मार्गिकेमुळे शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांचे पाकिस्तानातील कर्तारपूर येथील चिरविश्रांती स्थळ भारताच्या गुरुदासपूर जिल्ह्य़ातील डेरा बाबा नानक येथील तीर्थस्थळाशी जोडले जाणार असून त्यामुळे शीख समुदायाची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button