breaking-newsपुणेमहाराष्ट्र

नागरिक पर्यटनाला; चोरांची दिवाळी

विश्रांतवाडी परिसरात एकाच दिवशी पाच घरफोड्या

पुणे – दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सलग तीन ते चार दिवस पर्यटनाला गेलेल्या नागरिकांना चोरट्यांनी चांगलाच झटका दिला आहे. बंद घरे हेरुन चोरांनी अनेक ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. दिवाळीनिमित्त बॅंकेच्या लॉकरमधून आणलेले दागिने घरातच ठेऊन अनेक नागरिक पर्यटनाला गेले आहेत. त्याचाच फायदा चोरट्यांनी उठवला आहे. दरम्यान विश्रांतवाडी परिसरात एकाच दिवशी पाच घरफोड्यांच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये जवळपास पाच लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे.

दिवाळीत सलग सुट्ट्यांची संधी साधत पर्यटनाला सहकुटुंब जाण्याचा “ट्रेंड’ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे अनेक सोसायट्यांमधील सदनिकांना सध्या टाळे लागलेले दिसत आहे. यातील काही सोसायट्यांमध्ये तर सुरक्षा रक्षकही नसतात. ही संधी साधत चोरट्यांनी बंद सदनिका हेरुन घरफोडी करण्याचे सत्र मागील काही दिवस अवलंबले आहे. बंद सदनिदकांचे कुलूप तोडून किंवा कडी-कोयंडा उचकटून घरफोडी केली जात आहे. नागरिक सवयीप्रमाणे कपाटाची चावी गादी खाली किंवा पोटमाळ्यावर ठेवतात. घरातील सर्व किंमती ऐवज , रोकड आणी दागिने हे बेडरुमच्याच कपाटात ठेवलेले असताता. चोरांनाही ही बाब चांगलीच माहिती असल्याने अवघ्या पंधरा ते वीस मिनीटांत घरफोडीकरुन पसार होतात. यातील काही घरफोडी करणारे सराईत तर कारमधून येऊन घरफोडी करुन जातात. पोलीस खात्यातर्फे दरवर्षी नागरिकांना घराच्या सुरक्षेसंदर्भात आवाहन करण्यात येते. मात्र यानंतरही नागरिक किंमती ऐवज घरात ठेऊन पर्यटनाला जाताना दिसतात.

एकाच परिसरातील पाच सदनिका फोडल्या
विश्रांतवाडी परिसरातील धानोरी येथील एकाच परिसरात पाच सदनिका फोडण्यात आल्या आहेत. याप्रकरणी अनिल पाटील ढवळे यांनी फिर्याद दिली आहे. ते एका शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करतात. ते भाऊबीजेनिमीत्त सहकुटुंब बहिणीच्या गावी शिरुर येथे गेले होते. ते सोमवारी पहाटे घरी येण्यास निघाले असताना सोसायटीतील एका रहिवाशाने त्यांच्या घराचे लॉक तुटल्याचे मोबाइलवर सांगितले. त्यांनी घरात पाहणी केली असता कपाटातील दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळले. या व्यतिरिक्त त्यांच्या सोसायटीमधील दोन सदनिका आणि शेजारच्या सोसायटीमधील दोन सदनिकांमध्येही चोऱ्या झाल्याचे उघडकीस झाले आहे. अनिल ढवळे पाटील यांच्या सदनिकेतून 4 लाख 90 हजाराच्या ऐवजाची चोरी झाली आहे. चोरट्यांनी जाताना त्यांच्या सीसीटीव्हीच्या वायर कापल्याचे आढळले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे चारच्या सुमारास एका ऑल्टो गाडीतून चोरटे कटावणीसारखे हत्यार घेऊन आल्याचे दिसत आहे.

दिवसभरात 5 घटना
विश्रांतवाडी परिसरात सोमवारी दिवसभरात घरफोडीच्या 5 घटनांची नोंद झाली आहे. या घटना टिंगरेनगर, वडारवस्ती आणि धानोरी येथे घडल्या आहेत. यामध्ये जवळपास 4 लाख 90 हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button