breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

नववर्षांनिमित्त समुद्रातील पाटर्य़ाना उधाण

क्रूझ, तरंगत्या उपाहारगृहांच्या आगाऊ नोंदणीला प्रतिसाद

समुद्राच्या लाटांवर तरंगत नववर्षांचे स्वागत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रूझ पाटर्य़ाना यंदा मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी काही महिन्यांपूर्वी सेवेत दाखल झालेल्या आंग्रीय क्रूझ आणि क्वीन्सलाइनच्या दोन तरंगत्या उपाहारहगृहांवर खास पाटर्य़ा आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक वर्गाच्या खिशाला परवडणाऱ्या दरांमध्ये या पाटर्य़ाचे नियोजन करण्यात आले आहे.

आंतरदेशीय क्रूझ पर्यटनाला प्रोत्साहन देण्याबरोबरच मुंबईकरांना तरंगत्या उपाहारगृहांची सफर घडविण्यासाठी ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’च्या पुढाकाराने एक क्रूझ आणि दोन तरंगती उपाहारगृहे सेवेत दाखल झाली आहेत. मुंबई-गोवा-मुंबई असा सागरी प्रवास घडवणारी आंग्रीया क्रूझ ऑक्टोबर महिन्यात सेवेत आली. तर नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस क्वीन्सलाइन कंपनीच्या सी याह आणि नेव्हरलॅण्ड या दोन तरंगत्या उपाहारगृहांची सेवा सुरू झाली. सेवेत दाखल झाल्यापासून या बोटींना पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नववर्ष स्वागतानिमित्त या तिन्ही बोटी विशेष पाटर्य़ासाठी  सज्ज झाल्या आहेत. नववर्षांचे उत्साहात स्वागत करू इच्छिणाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी ३० आणि ३१ डिसेंबरला खाद्यपदार्थाच्या मेजवानीसह बॅण्ड आणि डीजेसारख्या कार्यक्रमांची रेलचेल या बोटींवर असेल.

१०४ खोल्यांनी सुसज्ज असणाऱ्या आणि ४०० पर्यटकांचा लवाजमा पेलणाऱ्या देशातील पहिल्या आंतरदेशीय आंग्रीया क्रूझवर ३० आणि ३१ डिसेंबरला पार्टी होईल. मुंबई-गोवा-मुंबई या सागरी सफरीच्या २८ डिसेंबर ते जानेवारीपर्यंतच्या सर्व फेऱ्यांची आगाऊ नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती आंग्रीयाच्या व्यवस्थाप लीना कामत यांनी दिली. तर नववर्ष स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या पाटर्य़ा मुंबई नजकीच्या समुद्रात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आंग्रीयावर दोन दिवस नववर्ष स्वागत पार्टी होईल. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यानजीक विहार करणाऱ्या सी याह आणि नेव्हरलॅण्ड या दोन्ही उपाहारगृहांमध्येही ३१ डिसेंबर रोजी पार्टी होईल. केवळ २०० व्यक्तींनाच या पार्टीत प्रवेश देण्यात येईल. सी याह ही बोट गेट वे ऑफ इंडिया येथून आणि नेव्हरलॅण्ड ही बोट भाऊच्या धक्याजवळील आंतरदेशीय क्रूझ टर्मिनल येथून सागरी पाटर्य़ासाठी रवाना होईल. या दोन्ही उपाहारगृहांवरील पाटर्य़ामध्ये सहभागी होण्यासाठी प्रतिव्यक्ती ७ ते ९ हजार रुपयांदरम्यान पॅकेज ठेवण्यात आले आहे.

शुल्क अडीच ते सहा हजार रुपये

३० डिसेंबरला रविवार असल्याने विशेष पार्टीचे आयोजन करण्यात आले असून या पार्टीचे सहभाग शुल्क २५०० रुपये आहे. यादिवशी आंग्रीयाच्या तीन डेकवर सायंकाळी ६ ते पहाटे ४ या वेळात तीन वेगवेगळे बॅण्ड आणि डीजे सादरीकरण करतील. तर ३१ डिसेंबरला सायंकाळी ४ ते पहाटे ४ या वेळेत पार्टी होईल. या वेळी पुरुषांसाठी ६,००० रुपये आणि महिलांसाठी ५,००० प्रवेश शुल्क असेल. शिवाय जोडप्यांसाठी आणि गटाने येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष पॅकेज ठेवण्यात आले आहेत. पार्टीचे वेळापत्रक उशिरा जाहीर करूनही आगाऊ नोंदणीला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे कामत यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button