breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘कपाळी केशरी गंध, विठोबा तुझा मला छंद’ म्हणत लाखो वारकऱ्यांचे विठूमाऊलीच्या भेटीसाठी पंढरीकडे प्रस्थान

देहू –  ‘कपाळी केशरी गंध, विठोबा तुझा मला छंद’ म्हणत लाखो वारकऱ्यांनी विठूमाऊलीच्या भेटीसाठी पंढरीकडे प्रस्थान ठेवले आहे. जनसामान्यांचे दैवत असणाऱ्या लेकुरवाळ्या विठोबाच्या चरणी आषाढी एकादशीच्या दिवशी नतमस्तक होणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्या सोहळ्यात सहभागी झाल्या. “पाऊले चालती पंढरीची वाट’ म्हणत भक्तीपुर्ण वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम देहू गावातील इनामदार वाड्यात राहिला आहे. 

पालखीच्या प्रस्थानापूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांनी सपत्नीक संत  तुकाराम महारांजाच्या पादुकांचे पूजन केले. यावेळी खासदार अमर साबळे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे आदी उपस्थित होते.

आज (गुरुवारी) पहाटे पाच वाजता विठ्ठलच्या मुख्य मंदिरात महापूजा झाली. त्यानंतर सहा वाजता वैकुंठगमन स्थान मंदिरात महापूजा झाली. सकाळी सात वाजता तपोनिधी नारायण महाराज समाधीपूजा झाली. सकाळी अकराच्या सुमारास सुनील घोडेकर यांनी तुकोबांच्या पादुकांना चकाकी देऊन त्या मसलेकर यांच्या डोक्यावर दिल्या. त्या पादुका म्हातारबाबा दिंडीने इनामदार वाड्यात आणण्यात आल्या. दिलीप मोरे-इनामदार यांनी इनामदार वाड्यात पादुकांची पूजा केली. त्यानंतर पुन्हा बाराच्या सुमारास पादुका डोक्यावर घेऊन म्हातारबाबा दिंडीने मुख्य मंदिरासमोरील भजनी मंडपात आणण्यात आल्या. सकाळी दहा ते बारा या वेळेत संभाजी महाराज मोरे-देहूकर यांचे कीर्तन झाले.

संत तुकाराम महाराजांच्या या 333 व्या पालखी प्रस्थान सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी लाखो वैष्णवांनी इंद्रायणीकाठी दाटी केली होती. या सोहळयासाठी राज्यभरातून लाखो भाविक देहूत दाखल झाले होते. पालखीने जसे प्रस्थान ठेवले तसे टाळ-मृदंगाचा आवाज टीपेला पोहोचला. वारक-यांचा उत्साह दुणावला. वारकरी विठ्ठलनामासोबत डोलू लागले, नाचू लागले. इंद्रायणीच्या लाटांनीही या सुरात आपले सूर मिसळले. अवघा आसमंत विठ्ठलमय झाला. काहींना तुकाबांच्या पादुकांवर माथा ठेवण्याचे भाग्य लाभले. त्यांनी धन्यत्वाचा अनुभव घेतला. तर काहींनी मनोभावे नमस्कार करीत तुकोंबाचरणी आपली सेवा रुजू केली. हरिनामाच्या गजरात अवघी देहुनगरी दुमदुमून गेली.

पोलिस यंत्रणा सज्ज

सोहळ्यात सर्व प्रकारच्या सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.  एक उपविभागीय पोलिस अधिकारी,  सात पोलिस निरीक्षक,  19 सहाय्यक/ उपनिरीक्षक,  130 कर्मचारी,  75 महिला पोलिस,  70 वाहतूक पोलिस,  राज्य राखीव पोलिस दलाची एक प्लाटून,  आरसीएफचे एक पथक,  तसेच चार सशस्त्र जवान या सोहळ्यात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

आरोग्य विभागाची तयारी

जिल्हा आरोग्य विभागाने यात्रेकरूंच्या सेवेसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण सेवा चोवीस तास सुरू राहणार आहे.  विविध लसी, सर्पदंशावरील लस आदी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.  रुग्णांना तातडीच्या गरजेसाठी सुमारे पाच रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button