breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

युवा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा: ॲथलेटिक्सच्या पहिल्याच दिवशी २ सुवर्ण, २ रौप्य; अडथळा शर्यतीत अलिझाचा सोनेरी वेध

तीन हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत भाग्यश्रीला सुवर्णपदक

चेन्नई : महाराष्ट्राच्या धावपटूंनी दोन सुवर्ण व दोन रौप्य पदक जिंकून धडाकेबाज प्रारंभ केला. अलिझा मुल्ला हिने शंभर मीटर्स अडथळा शर्यतीत सुवर्णपदक जिंकले तर भाग्यश्री महल्ले हिने पदार्पणातच तीन हजार मीटर्स धावण्याची शर्यत जिंकून शानदार कामगिरी केली. आर्य कंदकुमार व संदीप गोंड यांनी अनुक्रमे लांब उडी व ११० मीटर्स अडथळा शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली.

चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे आजपासून सुरू झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेतील शंभर मीटर्स अडथळा शर्यतीत अलिझा हिने सुरुवातीपासूनच अडथळे पार करतानाचे अप्रतिम कौशल्य दाखविले आणि सातत्यपूर्ण वेग ठेवला होता. तिने ही शर्यत चौदा सेकंदात पार केली. ती मुंबई येथील विनायक वझे महाविद्यालयात शिकत आहे.

पदार्पणातच भाग्यश्रीची सुवर्णपदक

नागपूरची सतरा वर्षीय खेळाडू भाग्यश्री महल्ले हिने लांब अंतराच्या शर्यतीत आवश्यक असणारे कौशल्य दाखवीत येथे तीन हजार मीटर्स शर्यतीचे विजेतेपद पटकाविले. हे अंतर तिने दहा मिनिटे १३.५२ सेकंदात पार केले. या शर्यतीमध्ये शेवटचे १२० मीटर्स अंतर बाकी असताना ती चौथ्या क्रमांकावर होती मात्र तेथून तिने मुसंडी मारून आपल्या पुढे असलेल्या तीनही खेळाडूंना मागे टाकले आणि प्रथम क्रमांक घेतला.

भाग्यश्री हिचे वडील विश्वेश्वर व आई सारिका हे दोन्ही खो खो खेळाडू असून त्यांच्या प्रोत्साहनामुळेच तिने मैदानी स्पर्धांमध्ये करिअर करण्यास सुरुवात केली. ती नागपूर येथे जितेंद्र घोडदरेकर व सायली वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. ती प्रियदर्शनी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेत आहे. शिक्षण व क्रीडा या दोन्ही क्षेत्रात सर्वोत्तम यश मिळविण्याचे ध्येय आहे.

हेही वाचा – मनोज जरांगे यांची पदयात्रा आज पिंपरी-चिंचवड शहरात, वाहतुकीत मोठा बदल

जन्म ठिकाणीच आर्य याला रौप्य

मुलांच्या लांब उडी मध्ये सतरा वर्षीय खेळाडू आर्य याने तिसऱ्या प्रयत्नात ७.१० मीटर्स पर्यंत उडी घेतली आणि रौप्यपदक पटकाविले. त्याने कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेमध्येही चमकदार कामगिरी केली होती. योगायोगाची गोष्ट म्हणजे त्याचा जन्म चेन्नई येथीलच आहे. त्यामुळे या शहरात झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेतील पदकामुळे त्याला खूपच आनंद झाला आहे.

पदकाबाबत तो म्हणाला, पदक मिळण्याची मला खात्री होती. माझे वडील कंदकुमार हे क्रिकेट खेळत होते आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी क्रीडा क्षेत्रात आलो. सांघिक खेळाऐवजी ॲथलेटिक्स सारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारात अधिक संधी असल्यामुळे मी या खेळामध्ये करिअर करीत आहे. सध्या मी मुंबई येथे राहत असलो तरी बंगळूरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षण केंद्रात सराव करीत आहे. यंदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत पदक मिळण्याचे माझे ध्येय आहे.

दुखापतीवर मात करीत संदीपचे स्वप्न साकार

खेलो इंडिया स्पर्धेपूर्वी जेमतेम दहा दिवसांपूर्वी संदीप याला स्नायूंची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पदक कसे मिळणार असे त्याच्या चाहत्यांना वाटत होते परंतु या दुखापतीवर उपचार करीत त्याने या स्पर्धेसाठी नियोजनबद्ध सराव केला. त्यामुळेच त्याला या स्पर्धेत पदक मिळवण्याचे स्वप्न साकार करता आले. त्याने ११० मीटर्स अडथळा शर्यत १३.८९ सेकंदात पार केली.

अठरा वर्षीय खेळाडू संदीप हा नागपूर जिल्ह्यातील उमरट या तालुक्यातील खेळाडू असून त्याचे वडील किराणा दुकान चालवतात. संदीप सुरुवातीला कबड्डी खेळत असे परंतु त्याचा मित्र गजानन ठाकरे हा स्वतः कमी अंतराच्या शर्यतीत भाग येत असे आणि त्याच्या प्रोत्साहनामुळेच संदीपही ॲथलेटिक्सचा सराव करू लागला. त्याला पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनीत महेश पाटील या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. नुकताच त्याने रिलायन्स स्पोर्ट्स फाउंडेशनच्या अकादमीत सराव सुरू केला आहे.

जिम्नॅस्टिक्स मध्ये आर्यन दवंडेला आणखी एक सुवर्णपदक

महाराष्ट्राच्या आर्यन दवंडे याने फ्लोअर एक्झरसाईज या प्रकारात सुवर्णपदक जिंकून दुहेरी मुकुट मिळविला. त्याने याआधी वैयक्तिक सर्वसाधारण प्रकारातही सुवर्णपदक जिंकले होते. तसेच त्याने रिंग प्रकारात कांस्यपदक जिंकले. फ्लोअर एक्सरसाईज मध्येच महाराष्ट्राच्या आयुष खामकर याला कांस्यपदक मिळाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button