Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजकीय सत्तासंघर्षामुळं जिल्हा परिषदेतील समीकरणे बदलणार?; इच्छुकांची ‘वेट अॅण्ड वॉचची भूमिका

नाशिकः राज्यात उद्भवलेल्या अभूतपूर्व राजकीय परिस्थितीचे पडसाद जिल्ह्यातील गट-गणांच्या राजकारणावरही पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेवर आता ११ जुलै रोजी सुनावणी होणार असली तरी तोपर्यंत जिल्ह्यात आगामी निवडणुकांसाठी प्रारूप आराखड्यास अंतिम स्वरूप आले आहे. त्यामुळे संभाव्य मतदारसंघातील भौगोलिक मर्यादा स्पष्ट होताच इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू होणार आहे. मात्र, या मोर्चेबांधणीस यंदा बदलत्या राजकीय समीकरणांची किनार असल्याने इच्छुकांकडून थेट कुठलीही पावले टाकण्याअगोदर ‘वेट अॅण्ड वॉच’ ची भूमिका घेतली जात आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा परिषदेचा कार्यभार प्रशासनाच्या हाती असला तरी लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात येण्याअगोदर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचेच वर्चस्व होते. पाच वर्षांपूर्वी सत्ता स्थापन होतेवेळी जिल्हा परिषदेमध्ये भाजप आणि शिवसेनेतील दुहीचा फायदा महाविकास आघाडी स्थापन होण्यासाठी झाला. महाविकास आघाडीच्या समीकरणामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद शिवसेनेकडे गेले होते. त्यानंतरचा लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ विचारात घेता राष्ट्रवादी आणि ‘मविआ’मधील घटकपक्षांचे वर्चस्व जिल्हा परिषदेत दिसून आले होते. त्यामुळे आगामी निवडणुकांचे वेध लागताच ‘मविआ’च्या घटकपक्षांचेच पारडे जड असण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यानुसार इच्छुकांकडून रणनीतीस सुरुवातही झाली होती. मात्र, दरम्यानच्या काळात आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुकाही पुढे गेल्या आहेत. आता राज्यात सत्तांतराचे वारे वाहत असल्याने वारा वाहील तिकडे तोंड फिरवण्यात राजकीय आखाड्यातील अनेक उमेदवार धन्यता मानणार आहेत. सन २०१७ मध्ये जिल्हा परिषदेत एकूण ७३ जागांपैकी शिवसेनेकडे २५, राष्ट्रवादीकडे १८ तर काँग्रेसच्या ८ जागा होत्या. त्यावेळी भाजपला १५ जागांवर समाधान मानावे लागले होते, तर माकपकडे तीन व अपक्ष आणि इतर मिळून चार असे पक्षीय बलाबल होते. भाजप आणि शिवसेनेतील दुहीनंतर जिल्हा परिषदेतही ‘मविआ’चेच समीकरण वापरत चुरशीच्या निवडणुकीत अध्यक्षपदावर शिवसेनेची वर्णी लागली होती.

राष्ट्रवादीचे पारडे जड, पण…

आता काही महिन्यांत होऊ घातलेल्या संभाव्य पंचायत समिती गट आणि गणांच्या निवडणूकीतही राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पारडे जड असल्याचे मानले जात असताना बदलत्या समीकरणांनी राजकीय घटकांना पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडले आहे. येत्या काही दिवसांत संभाव्य निवडणुकांसाठी एखादी जाहीर भूमिका घेण्याअगोदर काही दिवसांसाठी तरी ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका इच्छुक घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button