Uncategorizedताज्या घडामोडीपुणे

पाऊस लांबला; धरणांनी गाठला तळ; पुण्यात पाणीकपातीचा शक्यता

पुणेः पुण्याच्या विविध उपनगरांत अघोषित पाणीकपात सुरू असतानाच संपूर्ण शहरात पाणीकपात लागू होण्याची शक्यता आहे. जूनमधील अत्यंत अपुरा पाऊस, खडकवासला धरणसाखळीत कमी झालेला पाणीसाठा यांमुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली असून, महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी आज (मंगळवारी) पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबाबत तातडीची बैठक बोलावली आहे.

चिंतेचे कारण काय?

शहरात साधारणत: जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सून सुरू होतो. यंदा मान्सून वेळेत आला असला, तरी पावसाने अजिबात जोर धरलेला नाही. आतापर्यंत पुण्यात केवळ ३३.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. खडकवासला प्रकल्प साखळीत फक्त २.७६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. पुण्याला दररोज १६८५ दशलक्ष घनमीटर (एमएलडी) पाणी पुरवण्यात येते. पावसाने आणखी काही काळ ओढ दिल्यास अंदाजे दीड ते दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याने चिंताजनक स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पाणीपुरवठा विभागप्रमुखांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर येथील भारतीय हवामानशास्त्र विभागाला भेट देऊन पावसासंदर्भात माहिती घेतली.

आजची बैठक कशासाठी?

पुण्यातील पाण्याची सद्यस्थिती, पावसाचा अंदाज, पाऊस लांबला असताना यापूर्वी केल्या गेलेल्या उपाययोजना यांचा आढावा घेण्यासाठी आज बैठक होत आहे. बैठकीत पाणीकपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. गरज भासल्यास पाणीपुरवठ्यासाठी धरणातील अचल साठा उचलण्याचा पर्याय महापालिकेला अवलंबावा लागेल.

पाणीसाठा का कमी झाला?

खडकवासला धरणसाखळीत फक्त २.७६ टीएमसी पाणीसाठी शिल्लक आहे. दर वर्षी उन्हाळ्यात शेतीसाठी एक आवर्तन घेतले जाते. यंदा मात्र मे महिन्यात दोन आवर्तने घेतली गेली. त्याद्वारे सात टीएमसी पाणी शेतीसाठी सोडले गेले. अतिरिक्त आवर्तनामुळे ३.५ टीएमसी पाणी कमी झाले.

पुण्याला पाणी किती लागते?

करोनाच्या साथीपूर्वी महापालिकेतर्फे दररोज १२२५ एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता. नियमाप्रमाणे हद्दीलगतच्या गावांनाही पालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जात होता. सध्या पालिकेतर्फे दररोज १६८५ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. तरीही शहराच्या काही भागांसह उपनगरांत पाणीटंचाई आहे. त्यामुळे पालिकेला भामा आसखेड धरणातून दीड ते दोन टीएमसी तर खडकवासला धरणातून तीन टीएमसी पाणी अतिरिक्त घ्यावे लागत आहे.

अधिकारी काय म्हणतात?

‘शहरात आतापर्यंत पुरेसा पाऊस झालेला नाही. याबाबत सोमवारी आम्ही हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांशी चर्चा केली. अनुकूल स्थिती असतानाही पावसाने जोर धरलेला नाही. मात्र, काही दिवसात चांगला पाऊस होईल व यंदाच्या मोसमात सरासरी पाऊस होईल, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. मंगळवारी आयुक्तांच्या दालनात पाणीपुरवठ्यासंदर्भात बैठक होणार आहे. मात्र, तातडीने पाणीकपात लागू होण्याची शक्यता नाही,’ असे पुण्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button