Uncategorizedताज्या घडामोडीपुणे

सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरण; पंजाब पोलिस घेणार संतोष जाधवचा ताबा?

पुणेः प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आणि ओंकार बाणखेले खून प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष सुनील जाधव (वय २८, रा. मंचर) याला विशेष न्यायालयाने सोमवारी पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. जाधव याला पंजाब पोलिस तपासासाठी ताब्यात घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बाणखेलेच्या खुनानंतर फरारी संतोषला आश्रय देणाऱ्या सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाळ (वय १९, रा. नारायणगाव), नवनाथ सुरेश सूर्यवंशी (वय २८, रा. गुजरात) आणि तेजस कैलास शिंदे (वय २२, रा. नारायणगाव) यांचीही पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी दिले.

पूर्ववैमनस्यातून सोशल मीडियावर एकमेकांना ठार करण्याच्या धमक्यांचे स्टेटस ठेवल्याच्या कारणातून गेल्या वर्षी एक ऑगस्टला आंबेगावमधील एकलहरे गावात ओंकार बाणखेलेचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात संतोष जाधवसह चौदा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मकोका) मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संतोष जाधव, सौरभ महाकाळ, नवनाथ सूर्यवंशी, तेजस शिंदे यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी दुपारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.

आरोपीकडून साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही; तसेच गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडे तपास करून आरोपीविरोधात पुरावा गोळा करायचा आहे आणि पुरवणी दोषारोपपत्र दाखल करायचे आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी न्यायालयाला दिली. त्यानंतर न्यायालयाने चारही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. पंजाब पोलिसांकडून जाधवचा ताबा घेतला जाणार आहे. पंजाब पोलिसांकडून अद्याप कोर्टात तसे वारंट दाखल केले नसले, तरी येत्या दोन दिवसांत तशा हालचाली होतील आणि त्याला पंजाबमध्ये नेले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button