breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

भाजपा नेत्या पंकजा मुंडेंना पिंपरी-चिंचवडमधून ‘मदत’ होईल का?

खापरे, खाडे, घोळवे यांच्या भूमिकेकडे लक्ष : राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय प्रश्न

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयाने १९ कोटी रुपयांची नोटीस बजावली असून, त्या आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी राज्यभरातील समर्थक पुढे आले आहेत. आता एकेकाळी पिंपरी-चिंचवडमधील मुंडे गटाच्या ‘कट्टर समर्थक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या विद्यमान आमदार उमा खापरे, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, नवनगर प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे आणि माजी उपमहापौर केशव घोळवे आदी नेत्यांच्या भूमिकेकडे मुंडे समर्थकांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात भाजपा रुजवण्यात स्व. गोपिनाथ मुंडे यांचा मोठा वाटा आहे. त्याकाळी शहरात मुंडे समर्थक आणि गडकरी समर्थक असे दोन अप्रत्यक्ष गट होते. भाजपा विरोधी पक्षात असला आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ताकद कमी असली तरी, स्व. गोपिनाथ मुंडे यांनी सघटनात्मक पदाधिकाऱ्यांना मोठी ताकद दिली होती.

२०१४ मध्ये राज्याच्या सत्तेत भाजपा आली. त्यानंतर २०१७ मध्ये महापालिकेतील भाजपा सत्ताधारी पक्ष बनला. त्यामुळे मुंडे व गडकरी समर्थकांना महत्त्वाच्या पदांवर संधी देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने विधान परिषदेच्या विद्यमान आमदार उमा खापरे, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, नवनगर प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे आणि माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या सर्वच नेत्यांनी भाजपा निष्ठावंत म्हणून संधी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे प्रत्यक्ष भेटून त्या-त्यावेळी कृतज्ञताही व्यक्त केली आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणातून ‘साईडट्राईक’ केले जात असल्याची चर्चा होती. आता जीएसटी आयुक्तालयाने १९ कोटी रुपयांची नोटीस बजावली. त्या आर्थिक अडचणीत असल्याचे त्यांनी जाहीरपणे एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले. त्यामुळे राज्यभरातील मुंडे समर्थकांनी धनादेश, रोख असा मदतीचा ओघ सुरू केला. परिणामी, पिंपरी-चिंचवड शहरातून मदतीसाठी पुढाकार घेतला जाईल, अशी अपेक्षा होती मात्र, तसे चित्र दिसत नाही.

याबाबत आमदार उमा खापरे यांच्याशी संपर्क केला असता, त्या म्हणाल्या की, ज्येष्ठ नेते सदाशिव खाडे यांच्याकडे संपर्क करा. ते याबाबत तुम्हाला माहिती देतील. दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांना संपर्क केला असता ते म्हणाले की, मी सध्या कामात आहे. शहरातील मुंडे समर्थक नेत्यांचा प्रतिसाद पाहता पंकजा मुंडे यांना अर्थिक मदतीसाठी कोणीही पुढे येईल, याबाबत साशंकता दिसत आहे. परिणामी, निष्ठावंत आणि समर्थक म्हणून विविध पदांचा लाभ मिळणाऱ्या स्थानिक मुंडे समर्थक नेत्यांनी आत्मचिंतन करावे, अशी खंत व्यक्त केली जात आहे.

आमदार उमा खापरे पुढाकार घेतील काय?

मुंडे समर्थकांनी आर्थिक मदतीसाठी ‘गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठान’ च्या नावाने वर्गणी जमा करण्यास सुरूवात केली आहे. सोशल मीडियावर तसे धनादेश व्हायरल होत आहेत. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुरू असलेला मदतीचा ओघ मुंडे कुटुंबियांप्रती असलेली सहवेदना अधोरेखित करणारी आहे. असे चित्र राज्यभरात असताना पिंपरी-चिंचवडमधील मुंडे समर्थक म्हणून ओळख असलेला एकही नेता मदतीसाठी पुढे आलेला दिसत नाही. विधान परिषदेच्या विद्यमान आमदार उमा खापरे यांनी याबाबत पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा सामान्य मुंडे समर्थकांमधून व्यक्त होत आहे. कारण, उमा खापरे यांना मुंडे यांच्या मदतीमुळे दोनवेळा नगरसेवकपदाचे तिकीट, महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद, संघटनेमध्ये शहराध्यक्षासह विविध महत्त्वाची पदे मिळालेली आहेत. उमा खापरे यांना राजकीय ‘प्लॅटफॉर्म’ देण्यात स्व. गोपिनाथ मुंडे यांचा वाटा मोठा आहे. सध्या विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती करण्यातही पंकजा मुंडे यांनी निर्णायक भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे उमा खापरे मदतीसाठी पुढाकार घेवून राजकीय परतफेड करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कामगार नेते केशव घोळवे यांच्या भूमिकेकडे लक्ष…

कामगार क्षेत्रात विशेष प्रभाव असलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर केशव घोळवे यांची ओळख मुंडे समर्थक अशीच आहे. त्यांना उपमहापौर पदाची संधी देताना तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिफारस लावून धरली होती. त्यामुळे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांचे तत्कालीन समर्थक नगरसेवक वसंत बोराटे यांना नाराज करुन घोळवे यांना उपमहापौरपदावर वर्णी लावण्यात आली. पंकजा मुंडे यांनी त्यावेळी ‘‘किमान सहा महिने केशवला संधी द्या…’’ असा आग्रह धरला होता. लांडगे यांना डावलून केशव घोळवेंना उपमहापौरपदी संधी मिळाली. त्यामुळे नाराज झालेल्या वसंत बोराटे यांनी महेश लांडगे यांची साथ सोडली आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता घोळवे मुंडे घराण्याच्या मदतीसाठी पुढाकार घेतील काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासह राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांचाही पवित्रा निर्णायक ठरणार आहे. विशेष म्हणजे, मुंडे गटाकडून सर्वाधिक लाभार्थी असलेले सदाशिव खाडे यांनी सर्व मुंडे समर्थक नेत्यांची मोट बांधून पिंपरी-चिंचवडमधून आर्थिक मदत उभा केली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मला मुंडे कुटुंबियांप्रति आदर आहे. पंकजा मुंडे भाजपाच्या नेत्या आहेत. त्यामुळे मी वैयक्तिक आत्मियतेमुळे त्यांना आर्थिक मदत करणार आहे. दोन दिवसांत मी प्रत्यक्ष त्यांना भेटणार आहे. त्यावेळी माझ्या क्षमतेप्रमाणे मी मदत करेन. स्व. गोपिनाथ मुंडे यांना मानणाऱ्या प्रत्येकाची हिच भावना आहे.
– मोरेश्वर शेडगे, माजी स्वीकृत नगरसेवक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button