breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#WAR AGAINST CORONA: अमरावतीमध्ये कोरोनाची ‘एन्ट्री’; 3659 रूग्णांची तपासणी : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती । महाईन्यूज । प्रतिनिधी

जिल्ह्यात घरोघर तपासणी मोहिमेत अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवकांवर महत्वाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. यंत्रणेत जबाबदारी टाकण्यात आलेल्या कुणीही मुख्यालय सोडू नये. सर्व यंत्रणा चांगले काम करत आहे. मात्र, कुणातही बेजाबदारपणा आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही शिस्तीचे पालन करावे, शिस्तभंग करून आपले व इतरांचेही अमूल्य जीवन धोक्यात जाईल, असे वर्तन कुणीही करू नये, असे आवाहन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

ॲड. ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात काल एका निधन झालेल्या व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे आपण सर्वांनीच अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे विशेष मोहिमेत काटेकोर तपासणी करावी. कोरोनावर मात करणे हे आपल्यापुढील महत्वाचे आव्हान आहे. त्यामुळे नागरिकांनीही शिस्त पाळली पाहिजे. आपल्या बेजबाबदार वर्तनाने केवळ स्वत:लाच नव्हे, तर इतरांनाही धोका होऊ शकतो, याचे भान ठेवावे. आरोग्य पथकांकडून जिल्ह्यात घरोघर तपासणी होत आहे. ताप, खोकला, श्वसनक्रियेत अडथळा अशी कुठलीही तक्रार असल्यास तत्काळ त्याची माहिती पथकाला द्यावी. कुठलीही माहिती लपवू नका.
आपल्यासह घरातील ज्येष्ठांचीही विशेष काळजी घ्या. ज्येष्ठ नागरिकांतही असे कुठलेही लक्षण आढळून आल्यास तत्काळ शासकीय रूग्णालयात जाऊन तपासणी करावी. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, तुम्ही अंतर ठेऊन वागाल तर कोरोनाचा धोकाही तुमच्यापासून दूर राहील. बाहेरून आलेल्या व्यक्ती किंवा ताप, खोकला आदी लक्षणे आढळणा-या व्यक्तींची वैद्यकीय पथकांकडून नियमित तपासणी होत आहे. आवश्यक त्या व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेण्यात येत आहेत. थ्रोट स्वॅब तपासणीसाठी 208 नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यातील 93 अहवाल निगेटिव्ह आहेत. अद्याप 103 अहवाल प्रलंबित आहेत. आज 59 नमुने पाठविण्यात आले आहेत. जिल्हा रूग्णालयाकडून 3659 रूग्णांची तपासणी झाली असून, त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सुमारे 25 हजार नागरिकांहून अधिक व्यक्तींना होम क्वारंटाईनची सूचना देण्यात आली आहे. अमरावतीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कोविड रूग्णालय सुरू करण्यात येत आहे. सर्दी, ताप, न्युमोनियाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी नेहमीच्या दवाखान्यात न जाता सरकारी रुग्णालयात, कोविड चाचणी केंद्रात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी, यासाठी हे स्वतंत्र रूग्णालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे इतर दवाखाने सुरक्षित राहतील, बंद होणार नाहीत. या कोविड रूग्णालयासाठी डॉक्टर, पारिचारिका, सुरक्षारक्षक असा 100 अधिकारी-कर्मचा-यांचा स्टाफ नियुक्त केला आहे. व्हेटिंलेटर्स व इतर आवश्यक साधनसामग्री सुसज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या सुविधेसाठी जिल्हा रुग्णालय व सुपरस्पेशालिटी रुग्णालयात सहायता केंद्रे सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका यांच्याकडून 18 जणांचे पथक काम करेल. प्रवासी नागरिक, मजूर बांधव यांच्यासाठी जिल्ह्याप्रमाणेच प्रत्येक तालुक्यात निवारा केंद्रे सुरू केली असून, त्यांची भोजन, निवास, आरोग्य दक्षता आदी व्यवस्था करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांकडूनही त्यासाठी योगदान मिळत आहे. शासकीय व इतर संस्थांच्या मदतीने तयार केलेल्या निवारागृहांत पाच हजारहून अधिक नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. या काळात चढ्या भावाने वस्तूची विक्री कुणी करू नये. सध्याच्या परिस्थितीचा दूरूपयोग करून जर कुणी नागरिकांना अडचणीत आणत असेल तर अशा समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button