TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रमुंबई

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं निधन

वयाच्या ९४ व्या वर्षी दादर येथील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

मुंबई : पद्मश्री तसंच महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९४ व्या वर्षी दादर येथील खासगी रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास. गेल्या काही महिन्यांपासून सुलोचनादिदी श्वसनाशी संबंधित संसर्गानं आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

आज सायंकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी सुलोचना दीदींचं निधन झालं. उद्या सायंकाळी ५ वाजता दादरच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सुलोचना यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुलोचनादीदींच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचं झालं तर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. सुलोचना यांचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी झाला. १९४३ यावर्षी त्यांनी अभिनयाच्या विश्वात पदार्पण केलं होतं. सुलोचना यांनी मराठी आणि हिंदी सिनेमांत चरित्र अभिनेत्री म्हणून काम केलं होतं.

अभिनयाच्या क्षेत्रात सुलोचना यांना भालजी पेंढारकर यांनी मार्गदर्शन केलं होतं. त्यांच्या तालमीत सुलोचनादीदी तयार झाल्या होत्या. दीदींनी आपल्या सोज्वळ दिसण्यानं आणि सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. प्रेक्षकांच्या मनात सुलोचनादीदी म्हणजे सोज्वळ, शांत आई अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली होती. सिनेमांमध्ये त्यांनी घरंदाज भूमिका साकारल्या होत्या. सुलोचनादीदींनी २५०हून अधिक मराठी तसच हिंदी सिनेमांत आपल्या अभियानाची छाप पाडली. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ यांसारखे त्यांचे अनेक सिनेमे गाजले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली…
सुलोचनादिदींना श्रद्धांजली अर्पण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तीनशेहून अधिक मराठी-हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाने सिनेसृष्टी संपन्न करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण सुलोचनादीदी यांच्या निधनाने एका सदाबहार व्यक्तिमत्वाला आज महाराष्ट्र मुकला आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्याही काळात आघाडीच्या अभिनेत्री म्हणून त्यांनी मोठा कालखंड गाजवला आणि त्यानंतर सुद्धा सातत्याने विविध भूमिका त्यांनी साकारल्या. जवळजवळ 50 हून अधिक वर्ष त्यांनी चित्रपटाचा पडदा गाजविला. व्यक्तिरेखा हुबेहूब जिवंत करणाऱ्या वात्सल्यमूर्ती आणि एका महान कलावंताला आज आपण सारे मुकलो आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button