breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणे

Vasu Baras 2022 : आज दिवाळीचा पहिला दिवस.. वसुबारस तिथी पूजन व महत्त्व..!

Vasu Baras 2022 : आज दिवाळीचा पहिला दिवस.. वसुबारस तिथी पूजन व महत्त्व..!

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

शुक्रवार २१ ऑक्टोबर रोजी आश्विन वद्य द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जाईल. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. यंदा एकादशीलाच वसुबारस साजरा केला जाईल, वसुबारस सण कसा साजरा करतात? या दिवशी काय करावे आणि काय करू नये?
वसुबारसचे व्रत कसे करावे? जाणून घेऊयात..
वर्षभरात येणारे सण-उत्सवांचा राजा मानल्या गेलेल्या दीपोत्सवाची सुरुवात वसुबारस सणाने केली जाते. भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्‍यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. यंदा एकादशीलाच वसुबारस साजरा केला जाईल, वसुबारस सण कसा साजरा करतात? या दिवशी काय करावे आणि काय करू नये? वसुबारसचे व्रत कसे करावे? जाणून घेऊयात..!

दिवाळीचा पहिला दिवस
अंध:काराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपावली. वसुबारस म्हणजेच गोवत्सद्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो. पण वस्तुत: तो सण वेगळा आहे. मात्र, देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारसेपासून दिवाळीला सुरुवात होते, असे मानले जाते. यंदा शुक्रवार, २१ ऑक्टोबर २०२२ रोजी निज अश्विन कृष्ण एकादशीला वसुबारस आणि रमा एकादशी आहे, त्यामुळे यंदाच्या वसुबारसला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे . समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो, अशी मान्यता आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.

वसुबारस पूजन
या दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात.
तत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते |

मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि ||
हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर, असा याचा अर्थ आहे. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात. उत्तर प्रदेशात त्या व्रताला बछवाँछ असे म्हणतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गाईची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत, त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.

वसुबारस सणाचे महत्त्व
भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात. ती सात्त्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार करावा, असे म्हटले जाते. सत्त्वगुणी, म्हणजेच आपल्या सहवासाने दुसर्‍याला पावन करणार्‍या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणार्‍या, आपले अंग-प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणार्‍या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणार्‍या, शेतीला उपयुक्‍त अशा बैलांना जन्म देणार्‍या गोमातेचे या दिवशी पूजन करतात. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण, संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्‍ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही, असे सांगितले जाते. अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात होते.

वसुबारस सणाचे काही नियम
वसुबारण सणाच्या दिवशी गहू, मूग खात नाही. महिला या दिवशी दिवसभर उपास करतात. बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपास सोडतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ खात नाहीत, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button