परवानगी न घेता बीआरटी मार्गात खोदाई, काम थांबविण्याच्या मेट्रोला सूचना
- स्थापत्य बीआरटी विभागाने घेतली दखल
पिंपरी – निगडी ते दापोडी बीआरटी मार्गाचे कॉरिडॉर उखडून महामेट्रोचे काम सुसाट सुरू आहे. यासाठी मेट्रो व्यवस्थापनाने पालिकेची परवानगी घेतली नसल्याचे समोर येताच स्थापत्य बीआरटी विभागाने हे काम तातडीने थांबविण्याच्या सूचना मेट्रोला दिल्या आहेत. त्यावर हे काम सोमवारी (दि. 16) थांबविण्यात आले आहे.
निगडी ते दापोडीनंतर तयार झालेल्या सांगवी फाटा ते किवळे आणि नाशिक फाटा ते वाकड मार्गांवर बीआरटी सुरू झाली. मात्र, अनेकवेळा मुहूर्त काढून देखील या मार्गावर बीआरटी सुरू होऊ शकली नाही. सद्यस्थितीत या मार्गावर बीआरटी कॅरिडॉर व 36 बसस्टॉप तयार केले आहेत. त्यापैकी काही बसथांब्यांची दुरावस्था झाली होती. त्या बसथांब्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे चार कोटी, तर सुरक्षेसाठी महापालिकेने नुकताच मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र, मेट्रोच्या कामासाठी आता ठिकठिकाणी बीआरटी कॉरिडॉर काढण्यात येत आहे. पिंपरी चौकात खराळवाडी येथे मेट्रोसाठी बीआरटी कॅरिडॉर उखडून टाकण्यात आले आहेत.
दरम्यान, ज्या ठिकाणी मेट्रोने कॉरिडॉर उखडण्यात आले. तेथे काही दिवसांपूर्वी सिग्नल व कॉरिडॉरचे काम पालिकेने पूर्ण केले होते. त्यामुळे महापालिका व मेट्रो कंपनी यांच्यात बीआरटी व मेट्रोच्या कामाबाबत समन्वय ठेवला जात नसल्याची बाब स्पष्ट होत आहे. या मार्गावर बीआरटी कॅरिडॉर, निगडीतील बीआरटी टर्मिनल, बसथांबे उभारणे, त्यांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणा आणि इतर कारणांसाठी महापालिका सातत्याने कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. त्यातच मेट्रोकडून पालिकेची परवानगी न घेताच अशाप्रकारे बीआरटी कॉरिडॉरमध्ये खोदकाम केले जात आहे. त्यामुळे पालिकेने या बीआरटी मार्गावर केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात जात आहे.
बेकायदेशीर खोदाईची माहिती मिळताच स्थापत्य बीआरटी विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांनी तातडीने मेट्रो व्यवस्थापनाशी संपर्क साधून काम थांबविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यावर सोमवारी (दि. 16) मेट्रोने काम थांबविले होते.