breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात आजपासून अनलॉक! वाचा, तुमच्या जिल्ह्यात काय सुरू, काय बंद?

मुंबई – जवळपास गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन असलेला महाराष्ट्र आजपासून हळूहळू अनलॉक होत आहे. त्यानुसार मुंबई, ठाण्यासह राज्याच्या बहुतांश भागांतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येणार आहे. सरकारने साप्ताहिक बाधितांचे प्रमाण आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या दोन निकषांच्या आधारे पाच स्तरांत शिथिलीकरण करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा आढावा दर आठवड्याला घेण्यात येणार आहे.

निर्बंध शिथिल करताना मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, वसई-विरार, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ठाणे, नवी मुंबई, सोलापूर या महापालिका तसेच हिंगोली, नंदुरबार हे दोन जिल्हे स्तर दोनमध्ये येत असल्याने तेथील सर्व दुकाने उघडी राहतील. सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने तसेच सरकारी, खासगी कार्यालये, उद्यान, खेळाची मैदाने सुरू होतील. मॉल, उपाहारगृह, चित्रपटगृह, सभागृह क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. लग्नासाठी सभागृह क्षमतेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १०० लोकांना परवानगी असेल. व्यायामशाळा, केशकर्तनालय, स्पा येथे पूर्वनोंदणीने ५० टक्के क्षमतेने परवानगी असेल. तर अंत्यविधीसाठी मर्यादा नसेल. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी रविवारी दुपारी शहरातील निर्बंध शिथिल करण्यासंबंधीचे आदेश काढले.

तसेच मुंबई, पुणे, नाशिक, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र स्तर तीनमध्ये येत असल्याने येथे अत्यावश्यक सेवेतील व इतर सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंत खुली राहतील. अत्यावश्यक वगळता अन्य दुकाने शनिवार-रविवार बंद राहतील. मॉल्स, नाट्यगृहे बंदच राहणार आहेत. उपाहारगृहे ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. सार्वजनिक मैदाने, बागा, वॉकिंग ट्रॅक आणि सायकलिंगला सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत परवानगी असेल. तर खासगी कार्यालये संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के उपस्थितीत सुरू राहतील. चित्रपट, मालिका चित्रीकरण जैव-सुरक्षा परिघात (बायो-बबल) करण्यास परवानगी असून, गर्दी जमेल अशा चित्रीकरणाला परवानगी नाही. सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार परवानगी असेल. लग्न सोहळे ५० लोक उपस्थितीत पार पडतील आणि अंत्यसंस्कारासाठी २० लोक उपस्थित राहू शकतील. व्यायामशाळा, केशकर्तनालय, स्पा पूर्वनोंदणीने ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू राहील. या सर्व ठिकाणी जमावबंदी लागू राहणार असून संध्याकाळी ५ वाजल्यानंतर संचारबंदी लागू राहील. हेच नियम ठाणे (ठाणे आणि नवी मुंबई महापालिका वगळून) नाशिक, पालघर, वर्धा, अकोला, अमरावती, औरंगाबाद (महापालिका वगळून), बीड, भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद, परभणी, सोलापूर (महापालिका वगळून) आणि वाशिम जिल्ह्यात लागू असतील.

स्तर चारमधील पुणे, बुलढाणा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यावश्यक दुकाने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. अन्य दुकाने बंदच राहतील. या जिल्ह्यांत संचारबंदी कायम राहील. उपाहारगृह केवळ घरपोच सेवेसाठी सुरू राहतील. केशकर्तनालय, व्यायामशाळा ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. याठिकाणी केवळ लसीकरण झालेल्यांनाच परवानगी असेल. सार्वजनिक मैदाने, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग सोमवार ते शुक्रवारी सकाळी ५ ते ९ दरम्यान परवानगी असेल. शासकीय कार्यालये २५ टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मैदानी खेळ सोमवार ते शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत खेळता येतील, तर सभागृहांतील खेळास बंदी असेल. लग्न सोहळयास २५ तर अंत्यसंस्कारासाठी २० लोक उपस्थित राहण्यास परवानगी आहे. सार्वजनिक बस क्षमतेच्या ५० टक्के आसनक्षमतेने सुरू राहतील. तर ई-कॉमर्समध्ये केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणास परवानगी असेल. उद्योग व्यवसाय ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील.

दरम्यान, राज्यात अजूनही कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. लोकांना थोडा दिलासा देण्यासाठी निर्बंध शिथिल करताना जे निकष आणि पाच स्तर ठरविले आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना केली होती. तसेच कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारंभात गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, नियमांचे उल्लंघन खपवून घेणार नाही, अशी ताकीदही मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button