राज्यभरात बस चालकांचा बेमुदत संप
राज्यातील शाळा बस मालकांनी २ जुलै २०२५ पासून अनिश्चित काळासाठी संपावर
मुंबई : राज्यातील शाळा बस मालकांनी २ जुलै २०२५ पासून अनिश्चित काळासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. परिपत्रक जारी करत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. शालेय वाहतुकीसंदर्भातील अनेक समस्यांकडे शासनाचे व वाहतूक खात्याचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी या परिपत्रकात म्हटलं आहे.
शासनाने जर आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर २ जुलैपासून आम्ही संपूर्ण राज्यभर शाळा बस सेवा बंद ठेवू, असा इशारा या परिपत्रकातून देण्यात आला आहे. आमच्या संघटनेची भूमिका सेवा थांबवण्याची नसली, तरी शाळा बस व्यवसायात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे शाळा बस ऑनर्स असोसिएशनकडून सांगण्यात आलं आहे.
परिपत्रकात नेमकं काय आहे?
वाहतूक पोलिस आणि सीसीटीव्ही देखरेख यंत्रणेकडून मनमानी पद्धतीने ई-चलान जारी केल्याच्या निषेधार्थ अध्यक्ष अनिल गर्ग यांच्या नेतृत्वाखाती महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशनने २ जुलै २०२५ पासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे, असं या परिपत्रकात सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा – राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि ३० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवता आहे. मात्र, नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असल्याने आणि दैनंदिन वाहतूक धोक्यात असल्याने, बस मालक तात्काळ आणि अंतरिम मदतीची मागणी करत आहेत, असंही या परिपत्रकात म्हटलं आहे.
काय आहेत मागण्या?
यासंदर्भात बोलताना, अनिल गर्ग म्हणाले, हा प्रकार आर्थिकदृष्ट्या असह्य झाला आहे, आमच्या कर्तव्यासाठी आम्हाला दंड आकारला जात आहे आणि या दंडांचा एकत्रित भार स्कूल बस चालकांच्या उत्पन्नावर होतो आहे. त्यामुळे शाळांजवळील थांब्यांसाठी स्कूल बसेसविरुद्ध जारी केलेले सर्व प्रलंबित ई-चलन त्वरित माफ करावे, शालेय पिक-अप ड्रॉप ऑफ झोन निश्चित होईपर्यंत ई-चालान जारी करण्यावर स्थगिती द्यावी आणि दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी सरकार, आरटीओ, पोलीस आणि वाहतूक संघटनांसह संयुक्त टास्क फोर्सची स्थापना करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.




