पुण्यात एका महिलेने तब्बल 350 मांजरी घरात पाळल्याचा धक्कादायक प्रकार
पालिका प्रशासनाने महिलेवर कारवाईसाठी नोटीस बजावली

पुणे : पुण्यात एका महिलेने तब्बल 350 मांजरी घरात पाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील हडपसर येथील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. एका महिलेने तब्बल 350 मांजरी घरात पाळल्याने संपूर्ण सोसायटीमध्ये भीतीचे आणि त्रासाचे वातावरण निर्माण झाले आहे. या महिलेने तिच्या 3 BHK फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या संख्येने मांजरी ठेवल्यामुळे दुर्गंधी, आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी रहिवाशी हैराण झाले आहेत. यामुळे रहिवाशांचा मनस्ताप वाढला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील हडपसर येथील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील काही रहिवाशींनी 2020 मध्ये पुणे महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी त्या संबंधित महिलेकडे 50 मांजरी असल्याचे समोर आले होते. गेल्या पाच वर्षात हा आकडा 350 वर पोहोचला आहे. सोसायटीतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या मांजरांचा सतत उग्र वास येत असतो. तसेच ड्रेनेजमधून जाणारे दूषित पाणी आणि त्यांच्या रडण्याचा प्रचंड आवाज यामुळे आमचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळी या मांजरी मोठ्या आवाजात ओरडत असता. त्यांचा घाण वास संपूर्ण परिसरात पसरतो.
हेही वाचा : UPI युजर्ससाठी खुशखबर, ‘हा’ नियम बदलला, जाणून घ्या
महानगरपालिका काय कारवाई करणार?
रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने महिलेवर कारवाईसाठी नोटीस बजावली आहे. यावेळी प्रशासनाला विनंती केली आहे की, या मांजरांमुळे काही आजार पसरू शकतात. त्यामुळे त्वरित योग्य ती कारवाई करावी. गेल्या पाच वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. यामुळे प्रशासनाने योग्य पावले उचलावीत, अशी त्यांची मागणी आहे. या विचित्र घटनेमुळे पुण्यासह संपूर्ण राज्यात चर्चेला उधाण आले आहे. तसेच आता महानगरपालिका यावर पुढील कारवाई काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.