कुदळवाडी चिखलीतील अतिक्रमण कारवाई संदर्भात थेट राष्ट्रपतींकडे मागितली दाद!
राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मांडल्या मागण्या

व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करून कारवाई करा
पिंपरी : कुदळवाडी, चिखली भागामध्ये गेल्या 30 वर्षापासून व्यापारी व्यवसाय करत आहेत. यासाठी महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच विविध स्थानिक आस्थापनांचे परवाने घेतलेले असताना अमानुष पद्धतीने कारवाई करण्यात आली.व्यापाऱ्यांना नोटीस बजावल्यानंतर पुरेसा कालावधी देण्यात आला नाही. त्यामुळे शेड, कोट्यवधी रुपयांच्या मशीन, कच्चा माल यांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. व्यापाऱ्यांचे कधीही भरून न येणारे मोठे नुकसान पिंपरी चिंचवड महापालिकेने केले असून अद्यापही कारवाई सुरूच आहे. या कारवाई संदर्भात हस्तक्षेप करण्यात यावा. तात्पुरती ही कारवाई थांबवावी, उद्योजकांचे पुनर्वसन करावे अशी मागणी विश्व श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उद्योजक डॉ. लालबाबू गुप्ता यांनी देशाचे राष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच गुप्ता यांनी काही मागण्या देखील राष्ट्रपतीकडे पत्राद्वारे केल्या आहेत.
विश्व श्री राम सेना सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उद्योजक डॉ. लालबाबू गुप्ता यांनी देशाचे राष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे कुदळवाडी भागामध्ये झालेल्याअतिक्रमण कारवाईची तसेच व्यापाऱ्यांवर झालेल्या अन्यायाची माहिती दिली आहे.
हेही वाचा – मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास दाखवणारा ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रभरात करमुक्त व्हावा!
राष्ट्रपतींना दिलेल्या पत्रामध्ये लालबाबू गुप्ता यांनी म्हटले आहे, कुदळवाडी चिखली येथे गेल्या तीसहून अधिक वर्षांपासून विविध व्यापारी आपला व्यवसाय करत आहेत. या व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायत, महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आवश्यक एनओसी मिळवले आहेत आणि ते सर्व कर देखील भरतात.
अलिकडेच पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनाने या परिसरातील बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली.या कारवाईत गोदामे आणि मालमत्ता उद्ध्वस्त झाली आणि व्यापाऱ्यांचा संपूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त झाला असल्याचे देखील गुप्ता यांनी म्हटले आहे. त्यामुळे तूर्तास ही कारवाई थांबून आपण या प्रकरणात हस्तक्षेप करून व्यापाऱ्यांचे हित जपावी अशी मागणी लालबाबू गुप्ता यांनी केली आहे.
राष्ट्रपतींकडे केलेल्या मागण्या
औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिकांना जमीन देण्यात यावी.जे व्यापारी कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावत आहेत त्यांना होणाऱ्या आर्थिक नुकसानाची भरपाई देण्यात यावी. व्यापाऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी पुनर्वसन योजना राबवावी. व्यापाऱ्यांना न्याय देण्यासाठी तातडीने योग्य पावले उचलली जावेत यातून सामाजिक परिणाम रोखले जातील. कुदळवाडी चिखली परिसरात कारवाईमुळे उध्वस्त झालेल्या व्यापाऱ्यांना शेजारील एमआयडीसीमध्ये जागा आरक्षित करून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.