पिंपळे सौदागरचा ‘स्पेलिंग किंग’! आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कियान्श शर्माने मारली बाजी
शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते चिमुकल्या कियान्शचा गौरव

पिंपळे सौदागरच्या कु. कियान्श शर्माची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी; ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत जगात तिसरा! विद्यार्थ्यांसाठी ठरला प्रेरणास्त्रोत
पिंपरी | आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर पिंपळे सौदागर येथील कु.कियान्श शर्मा याने ‘MaRRS International Spelling Bee Competition’ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक पटकावून पिंपळे सौदागर तसेच शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कु.कियान्शच्या या देदीप्यमान यशाची दखल घेत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते त्याचा विशेष सन्मान करण्यात आला.
VIBGYOR Rise School (पिंपळे सौदागर) चा विद्यार्थी असलेल्या कियान्शने २६ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अंतिम फेरीत हे यश संपादन केले. या स्पर्धेत जगातील विविध देशांतील हुशार विद्यार्थी सहभागी झाले होते, ज्यांना मागे टाकत कियान्शने आपले स्थान निश्चित केले.

हेही वाचा
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा पुढाकार; स्वगणनेतून जनगणना मोहिमेला केली सुरुवात
यशाचा प्रवास:
कियान्शचा हा प्रवास शालेय स्तरावरून सुरू झाला होता. त्यानंतर आंतरशालेय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत कठीण फेऱ्या त्याने आपल्या एकाग्रता आणि चिकाटीच्या जोरावर यशस्वीरित्या पार केल्या. अखेर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली.
कियान्शचा सत्कार करताना शत्रुघ्न काटे म्हणाले की, “पिंपळे सौदागरमधील एका चिमुकल्याने जागतिक स्तरावर आपल्या शहराचे आणि देशाचे नाव उज्ज्वल केले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कियान्शचे यश हे त्याच्या शिस्तीचे आणि मेहनतीचे फळ आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात अशा प्रकारची बुद्धिमत्ता जोपासणे कौतुकास्पद आहे. तो शहरातील इतर अनेक विद्यार्थ्यांसाठी एक मोठे प्रेरणास्थान ठरला आहे.”
या प्रसंगी कियान्शचे पालक, शिक्षक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. सर्वांनीच त्याच्या या यशाचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





