“हार्दिकला कुणाचाच सपोर्ट नाही”; मुंबईच्या ड्रेसिंग रूमबद्दल माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा!

#मुंबई : आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सचा आणि कर्णधार हार्दिक पंड्याचा संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये. संघाच्या या खराब कामगिरीचे खापर प्रामुख्याने हार्दिकवर फोडले जात असताना, माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी याने मात्र हार्दिकची पाठराखण केली आहे. हार्दिकला संघातून अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याचे तिवारीने म्हटले आहे.
शनिवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या सातव्या पराभवानंतर हार्दिकवर टीकेची झोड उठली. ‘क्रिकबझ’शी मनोज तिवारी म्हणाला की, यंदाच्या आयपीएल हंगामातील मुंबई इंडियन्सचा प्रवास आता संपला आहे. मैदानावर जे दिसतेय त्याबद्दल मी उघडपणे बोलतो. हार्दिकच्या पाठीशी कुणीही उभे नाही असे मला वाटते. एका कर्णधार म्हणून अपेक्षित पाठिंबा त्याला मिळताना दिसत नाही.
तिवारीने केवळ हार्दिकला दोष न देता इतर खेळाडूंच्या कामगिरीवरही बोट ठेवले. तो म्हणाला, “हार्दिकची वैयक्तिक कामगिरी चांगली होत नाहीये हे मान्य; पण बाकीच्या खेळाडूंनीही जबाबदारी घ्यायला हवी. सूर्यकुमार यादव सातत्याने धावा करत नाहीये, तिलक वर्माने एका सामन्यानंतर आपली लय गमावली आहे. अशा कामगिरीच्या जोरावर तुम्ही निकाल कसा मिळवणार?”
हेही वाचा – सावधान! ऊसाचा रस पित आहात? डॉक्टरांचा थेट मोठा इशारा, आरोग्यावर अत्यंत घातक..
कागदावर मुंबई इंडियन्स हा सर्वात ताकदवान संघ मानला जातो. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांसारखे दिग्गज कर्णधार या संघात आहेत. असे असूनही रणनीतीच्या बाबतीत हा संघ पूर्णपणे विखुरलेला दिसला. संकटाच्या वेळी या संघाकडे कोणताही ‘प्लॅन-बी’ तयार नसल्याचे या मोसमात वारंवार दिसून आले आहे.
माजी फिरकीपटू मुरली कार्तिकने मुंबईच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. कार्तिक म्हणाला की, “मुंबईचे आता फक्त पाच सामने उरले आहेत. यापुढील सर्व म्हणजे पाचही सामने जिंकले तरी ते फक्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतील. सध्या गुणतालिकेत पंजाब किंग्स, आरसीबी, एसआरएच आणि राजस्थान रॉयल्स आधीच १२-१३ गुणांवर आहेत. त्यामुळे मुंबईचे या स्पर्धेतील आव्हान ९९.९९% संपले आहे असेच म्हणावे लागेल.”





