पुनावळेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; ढवळे दाम्पत्याचे कौतुकास्पद पाऊल
पुनावळे चौक मोकळा; सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम
पिंपरी : पुनावळे परिसरात सुरू असलेल्या मुख्यमार्गाच्या युद्धपातळीवरील कामामुळे तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज भुयारी मार्ग व पुनावळे चौक परिसरात निर्माण झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले होते. रोजच्या रोज वाढणाऱ्या वाहतूक कोंडीच्या तक्रारींमुळे विशेषतः आयटी क्षेत्रातील कर्मचारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. तासन्तास वाहतुकीत अडकून पडणे, वाढते प्रदूषण, तसेच वारंवार होणारे वादविवाद यामुळे नागरिकांचा संयम सुटत होता.

या गंभीर समस्येची दखल घेत भाजपचे शहर सचिव नवनाथ ढवळे आणि अदिरा इंटरनॅशनल स्कूलच्या डायरेक्टर सुमन नवनाथ ढवळे यांनी पुढाकार घेतला. पिंपरी-चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुनावळे येथील विस्कळीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी ढवळे दाम्पत्यांनी स्वयंखर्चातून वाहतूक वॉर्डनची नेमणूक केली आहे. एकूण दहा वाहतूक वॉर्डन दिवस व रात्र अशा शिफ्टमध्ये काम करणार असून ते वाकड वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार वाहतूक नियंत्रणाचे काम पाहणार आहेत.
हेही वाचा – ‘भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार’; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
या उपक्रमामुळे पुनावळे चौक व परिसरातील वाहतूक कोंडीला मोठ्या प्रमाणात आळा बसला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वाहतूक सुरळीत झाल्याने अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होत असून नागरिकांना मोकळा श्वास घेता येत आहे. या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाबद्दल पुनावळेकर नागरिकांकडून ढवळे दाम्पत्यांचे मनापासून आभार मानले जात असून सर्वत्र त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. तसेच अनेक ठिकाणी ढवळे यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावले आहेत.





