IND vs PAK : हायव्होल्टेज भारत-पाकिस्तान सामना आज; केव्हा आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या..

T20 World Cup 2026 | क्रिकेट जगतातील सर्वात मोठी आणि रोमांचक लढत म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज रंगणार आहे. जेव्हा जेव्हा हे दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी मैदानात आमनेसामने येतात, तेव्हा दोन्ही देशांतील क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो. आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२६ (ICC Women’s T20 World Cup 2026) स्पर्धेत हा महामुकाबला आज रंगणार असून, दोन्ही संघ विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
तसं पाहिलं तर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर नेहमीच वरचष्मा राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या १६ सामन्यांपैकी १३ सामन्यांत भारताने बाजी मारली आहे. यापूर्वी २०२४ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे आजच्या सामन्यातही भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे.
सामन्याची वेळ आणि ठिकाण
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा हायव्होल्टेज सामना आज रविवार, १४ जून २०२६ रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील ऐतिहासिक एजबॅस्टन (Edgbaston) मैदानावर होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) सायंकाळी ६:३० वाजता नाणेफेक (Toss) होईल, तर सामन्याला ठीक सायंकाळी ७:०० वाजता सुरुवात होईल.
हेही वाचा
लाईव्ह मॅच कुठे पाहता येणार?
क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा आनंद टेलिव्हिजनवर स्टार स्पोर्ट्स (Star Sports) नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर घेता येईल. जर तुम्हाला हा सामना मोबाईल किंवा लॅपटॉपवर पाहायचा असेल, तर जिओहॉटस्टार (JioHotstar) ॲप आणि त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर सामन्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असणार आहे.
दोन्ही संघांचे संभाव्य खेळाडू पुढीलप्रमाणे:
भारतीय संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, श्री चरणी, यस्तिका भाटिया, नंदनी शर्मा, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, क्रांती गौड, श्रेयंका पाटील, राधा यादव.
पाकिस्तान संघ:
फातिमा सना (कर्णधार), गुल फिरोजा, आयेशा जफर, इरम जावेद, आयमान फातिमा, आलिया रियाझ, नतालिया परवेझ, सायरा जबीन, मुनीबा अली, तुबा हसन, रमीन शमीम, सादिया इक्बाल, नशरा संधू, डायना बेग, तस्मिया रुबाब.





