महाराष्ट्रात मान्सून खोळंबला! विदर्भात उष्णतेचा ‘ऑरेंज अलर्ट’ तर अनेक जिल्ह्यांत वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’

पुणे | देशातील ईशान्येकडील राज्यांसह झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालच्या काही भागांत मान्सूनची समाधानकारक वाटचाल सुरू असून तिथल्या पावसाचा जोर वाढत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत देशाच्या आणखी काही भागांत मान्सून पुढे सरकण्यासाठी हवामान स्थिती अनुकूल आहे. मात्र, महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांपासून मान्सूनची सीमा एकाच ठिकाणी स्थिर असल्याने राज्यातील मान्सूनचे पुढील आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.
प्रशांत महासागरात ‘एल निनो’ स्थिती विकसित झाल्यामुळे यंदाच्या भारतीय मान्सूनवर त्याचा प्रभाव जाणवणार आहे. राज्यात मान्सून पुढे सरकण्यासाठी सध्या अनुकूल वातावरण नसल्यामुळे नागरिकांना तीव्र उकाडा आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागत आहे. आगामी ४ ते ५ दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे एकूण प्रमाण कमीच राहणार आहे.
हेही वाचा
गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांवर आता ‘मकोका’ लागू होणार! एफडीएचे मोठे पाऊल
उष्णतेचा इशारा
राज्यात मान्सून रखडल्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती निर्माण झाली असून पुढील एक ते दोन दिवस तापमान वाढलेले राहील. अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
वादळी पावसाचा अंदाज
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर किंवा संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक या जिल्ह्यांच्या घाट भागांसह जळगाव, बीड, परभणी आणि हिंगोली या भागात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.





