प्रवाशांनो कृपया लक्ष द्या..! रेल्वेच्या हार्बर, मध्य आणि पश्चिम अशा तिन्हीही मार्गावर मेगाब्लॉक
लांब पल्ल्याच्या गाड्यावर परिणाम ,वेळापत्रक कसं असणार?

मुंबई : लाखो मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर, मध्य आणि पश्चिम अशा तिन्हीही रेल्वे मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. दुरुस्ती आणि देखभालीसाठी घेण्यात आलेल्या या ब्लॉकदरम्यान उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे केली जाणार आहेत. या ब्लॉकदरम्यान मुंबई लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यावर परिणाम होणार आहे. यामुळे मुंबईकरांनी आज वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे, असा सल्ला रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
मध्य रेल्वेचे वेळापत्रक काय?
मुंबई उपनगरीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी १०.५५ ते दुपारी ३.३५ पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३२ पर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन स्लो गाड्या सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील.
हेही वाचा : विकी कौशलच्या ‘छावा’ची दमदार सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
तर घाटकोपरहून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.२९ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.
हार्बर मार्गावरील वेळापत्रक काय?
हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी यादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत सीएसएमटीहून पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द असतील. तसेच सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ पर्यंत सीएसएमटीहून पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येतील.
पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक
पश्चिम रेल्वेवर बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान मोठा ब्लॉक घेण्यात आला आहे. बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गांवर पाच तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात गोरेगाव आणि बोरिवली स्थानकांदरम्यानच्या सर्व अप आणि डाऊन जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर चालवल्या जातील. या ब्लॉकमुळे, अप आणि डाऊन मार्गावरील काही उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील. तसेच अंधेरी आणि बोरिवलीहून काही लोकल गाड्या हार्बर मार्गावरील गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील.