विकी कौशलच्या ‘छावा’ची दमदार सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

Chhava Box Office Collection Day 1 | छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विकी कौशल व रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ प्रदर्शित झाल्यानंतर सगळीकडे या सिनेमाचीच चर्चा आहे. एकूणच हा चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, ते जाणून घेऊयात..
अॅडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाने चांगली कमाई केली होती. त्यानंतर आता पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. मॅडोक फिल्म्सने दिलेल्या माहितीनुसार, ‘छावा’ने भारतात पहिल्या दिवशी ३३.१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर, जगभरात ५० कोटी रुपये कमावले आहेत. ‘ये छावा की दहाड है’ असं कॅप्शन देत निर्मात्यांनी आकडेवारी शेअर केली आहे.
हेही वाचा : मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय: कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामे, भंगार दुकानांना ‘‘अभय’’ नाहीच!
‘छावा’मध्ये विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, विनित सिंह, आशुतोष राणा, संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, निलकांती पाटेकर, शुभांकर एकबोटे, दिव्या दत्ता, नील भूपालम, प्रदीप राम सिंह रावत, डाएना पेंटी, रोहीत पाठक या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.
लक्ष्मण उतेकर यांनी ४ वर्षे अभ्यास करून छत्रपती संभाजी महाराजांवरील हा चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटासाठी कलाकारांनीही प्रचंड मेहनत घेतली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी तब्बल १३० कोटी रुपये खर्च केले आहेत.