या आठवड्यात सोने 1200 रुपयांनी तर चांदी हजाराने वधारली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनिश्चित व्यापारी धोरणांचा फटका,गुंतवणूकदारांनी या मौल्यवान धातुकडे मोर्चा वळवला

पुणे : सध्याच्या बदलत्या जागतिक समिकरणांमुळे सोने आणि चांदीने गेल्या वर्षीप्रमाणेच मोठे विक्रम नावावर नोंदवायला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षीच्या बजेटनंतर दोन्ही धातुत मोठी घसरण झाली होती. कर कपात हे त्यामागील कारण होते. या बजेटमध्ये या दोन्ही धातुसाठी आणि ग्राहकांसाठी सरकारने कोणताच दिलासा दिला नाही. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनिश्चित व्यापारी धोरणांचा फटका बाजाराला बसला आहे. धास्तावलेल्या जागतिक गुंतवणूकदारांनी या मौल्यवान धातुकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे किंमतीत मोठी वृद्धी दिसून येत आहे. या आठवड्यात सोने 1200 रुपयांनी तर चांदी हजाराने वधारली.
सोन्याची मोठी घोडदौड
या आठवड्यात सोने जवळपास 1200 रुपयांनी वधारले आणि 700 रुपयांनी स्वस्त झाले. सोमवारी 400 आणि मंगळवारी 320 रुपयांनी सोने महागले. तर बुधवारी 710 रुपयांनी दर आपटले. गुरुवारी त्यात 400 तर शुक्रवारी 100 रुपयांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,005 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
5 फेब्रुवारी रोजी चांदी 1000 रुपयांनी वधारली होती. तेव्हापासून ते 14 तारखेपर्यंत चांदीत मोठा बदल दिसला नव्हता. तर 14 फेब्रुवारी चांदीने दरवाढीचा व्हॅलेंटाईन साजरा केला. एक हजाराने किंमत वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,500 रुपये इतका आहे.
हेही वाचा : विकी कौशलच्या ‘छावा’ची दमदार सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 85,998, 23 कॅरेट 85,654, 22 कॅरेट सोने 78,774रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,499 रुपये, 14 कॅरेट सोने 50,309 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 97,953 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.