धोकादायक ‘सकरमाउथ’ मासा हरिपूरमध्ये कृष्णा नदीत आढळला
![Dangerous ‘Suckermouth’ fish was found in the Krishna River in Haripur](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/p.mh-2-3.jpg)
सांगली | नदीतील माशांच्या प्रजोत्पत्तीला धोका ठरणारा मांसाहारी सकरमाउथ मासा हरिपूर येथे कृष्णा नदीत आढळला आहे. दीड फूट लांबीचा वेगळाच दिसणारा या माशाला हेलिकॉप्टर फिशही म्हटले जाते. हौशींच्या घरातील काचेच्या मच्छ्यालयात शोभिवंत म्हणून आढळणारा हा मासा कृष्णेच्या पात्रात आढळल्याने मच्छीमारांची चिंता वाढली आहे.हरिपूर येथील विकास नलावडे या मच्छीमाराला कृष्णा नदीच्या पात्रामध्ये मासेमारी करताना सकरमाउथ कॅटफिश आढळून आला. पावसाळा सुरू झाल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीमध्ये मासेमारीचा मोसम सुरू झाला आहे. लालसर पाण्यात अनेक प्रकारचे मासे सध्या सापडत आहेत, मात्र सकरमाउथचे दर्शन झाल्याने धोक्याची घंटा वाजली आहे.
सकरमाउथ कॅटफिशमुळे कृष्णा नदीतल्या माशांना मोठा धोका निर्माण झाला आहे. सकरमाउथ कॅटफिश मांसाहारी असतो. त्यामुळे पाण्यातल्या इतर माशांना तो खातो. त्यामुळे येथील जलीय जीवांसमोर धोका निर्माण झाला आहे. सकरमाउथ कॅटफिश वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असतो.
सकरमाउथ कॅटफिश या नावाने ओळखला जाणारा मासा प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेतील अॅमॅझॉन नदीमध्ये आढळतो. मात्र आता उजनी जलाशयामध्येही याचा आढळ दिसून येत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये उत्तर प्रदेशातील रमना गावात गंगा नदीत आणि नोव्हेंबरमध्ये तो मध्य प्रदेशातील िभड येथील सिंधू नदीत आढळला होता, अशी माहिती जाणकारांकडून मिळाली.