मुंबईच्या महापौरपदासाठी शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा द्यावा; ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्याचे वक्तव्य

मुंबई | महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदे शिवसेनेच्या युतीला मोठे यश मिळाल्यानंतर, मुंबईच्या महापौरपदावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी मुंबईच्या महापौरपदासाठी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा, असं म्हटलं आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भास्कर जाधव म्हणाले, हे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे आणि याच वर्षी ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईत महापौर नाही, या सारखं दुसरं मोठं दु:ख नाही. त्यामुळे जे कोणी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात आहोत असं सांगत आहेत, जे कोणी बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून सांगतात, त्या सर्वांना आवाहन वजा विनंती करतो की हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर तुमची खरी श्रद्धा आहे का? बाळासाहेब ठाकरे यांच्यावर तुमचा विश्वास आहे का? बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही श्रद्धांजली अर्पण करू इच्छिता का? जर तुम्ही श्रद्धांजली अर्पण करू इच्छित असाल तर तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं पाहिजे आणि ज्या भाजपाबरोबर एकनाथ शिंदे आहेत, त्या एकनाथ शिंदेंना मी आवाहन करतो, तुम्ही भाजपाला सांगितलं पाहिजे की केंद्रामध्ये आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिला. महाराष्ट्रात देखील आम्ही तुमच्या (भाजपाला) सरकारला पाठिंबा दिला, तुमच्या बरोबर राहू. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षानिमित्त आपण मुंबईवर भगवा झेंडा फडकवला पाहिजे. त्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्याला तुम्ही मदत करू हे सांगण्याचं धाडस एकनाथ शिंदे यांनी केलं पाहिजे.
हेही वाचा : महापालिका निवडणुकीत ६९२ उमेदवारांपैकी ४२३ जणांचे डिपॉझिट जप्त..!
भास्कर जाधव यांनी ठामपणे सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १०० टक्के उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला पाहिजे. उद्धव ठाकरे तो पाठिंबा स्वीकारतील की नाही, हा नंतरचा प्रश्न आहे. मात्र स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणवणाऱ्यांनी मान, सन्मान, अहंकार बाजूला ठेवून कमीपणा घेतला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यावा, असे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.




