एसटी बसमधून बनावट दिव्यांग ओळखपत्रावर प्रवास… थेट गुन्हा दाखल होणार !

जळगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करताना दिव्यांगाना विशेष सवलत दिली जाते. मात्र, या सवलतीचा लाभ खऱ्या दिव्यांगांपेक्षा बोगस दिव्यांग जास्तकरून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर, बनावट दिव्यांग ओळखपत्रांचा वापर रोखण्यासाठी सखोल पडताळणी करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण विभागाने एसटी महामंडळाला दिले आहेत. त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम–२०१६ नुसार राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) दिव्यांग प्रवाशांना मोफत अथवा सवलतीच्या प्रवासाची सुविधा दिली जाते. मात्र, अलीकडच्या काळात बनावट दिव्यांग ओळखपत्रांच्या वापरात वाढ झाल्याने या सवलतीचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले होते. या अनुषंगाने दिव्यांग कल्याण विभागाने एसटी महामंडळाला सखोल पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या असून, त्यानुसार आता एसटीकडून कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग कल्याण विभागाच्या पत्रानंतर एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. यानुसार प्रवासादरम्यान दिव्यांग प्रवाशांकडील वैश्विक दिव्यांग ओळखपत्राची (यूडीआयडी कार्ड) काटेकोर तपासणी करण्यात येणार आहे.
तपासणी मोहिमेतून ओळखपत्राची वैधता, फोटो, तपशील आणि प्रत्यक्ष लाभार्थी यामध्ये सुसंगती आहे की नाही, याची खातरजमा केली जाणार आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे बनावट ओळखपत्रांच्या आधारे मोफत किंवा सवलतीचा प्रवास करणाऱ्यांना चाप बसणार आहे. तसेच खऱ्या आणि पात्र दिव्यांग प्रवाशांनाच सवलतीचा लाभ मिळावा, हा कारवाईमागील मुख्य उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दिव्यांग सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने ही पडताळणी प्रक्रिया प्रभावीपणे आणि सातत्याने राबविण्याचे नियोजन एसटी प्रशासनाने केले आहे. गरज भासल्यास संशयित प्रकरणांमध्ये संबंधित विभागाशी समन्वय साधून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या तपासणीमुळे सवलतीच्या नावाखाली होणारा गैरप्रकार थांबेल. खऱ्या दिव्यांग प्रवाशांना अधिक न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रवासादरम्यान आता यूडीआयडी कार्डवरील क्रमांक आणि जन्मतारीख नमूद करून त्याची वैधता तत्काळ तपासली जाणार आहे. कार्ड वैध असल्यासच प्रवाशांना मोफत अथवा सवलतीचा प्रवास दिला जाणार असून, अवैध किंवा संशयास्पद कार्ड आढळल्यास ते तत्काळ जप्त करण्यात येणार आहे. एसटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेली सर्व ओळखपत्रे संबंधित आगारात जमा केली जातील. बनावट, अवैध किंवा चुकीची माहिती असलेली कार्डे आढळल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ९१ नुसार आगारस्तरावर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे सवलतीचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे.
या कारवाईत पारदर्शकता राखण्यासाठी जप्त करण्यात आलेल्या कार्डांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येणार असून, त्याचा सविस्तर मासिक अहवाल संबंधित विभागीय कार्यालयात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे प्रत्येक प्रकरणावर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही तपासणी प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये विशेष ॲपचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. ॲपच्या माध्यमातून कार्डची वैधता तत्काळ तपासली जाणार असल्याने बनावट कार्डधारक सहज पकडले जातील, असा विश्वास एसटी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या उपाययोजनेमुळे खऱ्या आणि पात्र दिव्यांग प्रवाशांना न्याय मिळेल. तसेच सवलतीच्या नावाखाली एसटी महामंडळाला होणारे आर्थिक नुकसान थांबेल, असे एसटी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




