breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘राज्यात ह्युंदाई कंपनीकडून ४ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक; पुण्यात उभारणार प्रकल्प’; उदय सामंत यांची माहिती

पुणे : महाराष्ट्रात ह्युंदाई कंपनीकडून ४ हजार कोटींची गुंतवणूक होणार असून पुण्यात पहिला प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या गुंतवणूकीतून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच दक्षिण कोरीयातील लोट्टे ग्रुप, एलजी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीसुद्धा राज्यात गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

उदय सामंत म्हणाले, जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात ह्युंदाईच्या व्यवस्थापनासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. द. कोरीयामधील आइस्क्रीम बनविणारी आघाडीची कंपनी लोट्टे उद्योगसमूह सुद्धा पुण्यात ४७५ कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या हॅवमोअर ब्रँडचे उत्पादन या प्रकल्पात होणार आहे. हा प्रकल्प अनेक वर्षापासून रखडला होता, द. कोरीयाच्या दौऱ्यातील बैठकीत यावर सकारत्मक चर्चा झाली.

उदय सामंत म्हणाले, पाण्याच्या फिल्टरमध्ये असलेल्या ॲल्युमिनीअम झाकणीचा प्रकल्पही राज्यात येणार आहे. त्यासाठी ५ एकर जागेची मागणी कंपनीकडून करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पायाभूत सुविधा पुरविण्यात येतील. त्यामुळे या प्रकल्पास चालना मिळेल. तसेच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीच्या एल.जी कंपनीला महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीने पुण्यातील प्रकल्पाचा विस्तार करण्याचे सांगितले असून कंपनी जवळपास ९०० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. जे उत्पादन कोरीयात होते, असे उत्पादन भारतात येऊन करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

हेही वाचा – धक्कादायक! ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात एका रात्रीत तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू

भारतात ४ डोअर फ्रीजचे उत्पादन, ट्रान्सफरन्ट दूरचित्रवाणी संच, फोल्डेबल टिव्हीचे सेमीकंडक्टरचे उत्पादन करण्याची विनंती सॅमसंग कंपनीला करण्यात आली आहे, तसेच डिसेंबर महिन्यात कॉस्मेटीक उद्योजकांचे मंडळ भारतात भेट देणार असून लॅकमे कंपनी राज्यात आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. असे सांगून मंत्री उदय सामंत म्हणाले द. कोरीया देशाचा दौरा यशस्वी झाला असून आघाडीच्या कंपन्यांसोबत बैठका घेण्यात आल्या आहेत. तेथील उद्योजकांना राज्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील जे नागरीक द. कोरीयात आहेत, त्यांना राज्यात गुंतवणूक करायची असेल, तर अशा उद्योजकांना नवीन सवलती देण्यात येतील, राज्यात उद्योगासाठी पोषक वातावरण असून विदेशी गुंतवणूक राज्यात होत आहे.

यावर्षीपासून राज्यात राज्यस्तरीय उद्योग पुरस्कार

यावर्षीपासून राज्यात उद्योगरत्न, उद्योग मित्र, मराठी उद्योजक व महिला उद्योजक राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिला सोहळा २० ऑगस्ट २०२३ रोजी दु. २ वाजता जिओ सेंटर, बीकेसी, मुंबई येथे होणार आहे. राज्यस्तरीय पहिला उद्योग रत्न पुरस्कार हा टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच उद्योग मित्र पुरस्कार युवा पिढीतील उद्योजक सिरम इन्स्टीट्युटचे अदर पुनावाला यांना देण्यात येणार आहे. मराठी उद्योजक पुरस्कार हा नाशिक येथील सह्याद्री समुहाचे विलास शिंदे यांना, तर महिला उद्योजक पुरस्कार हा किर्लोस्कर समुहाच्या गौरीताई किर्लोस्कर यांना प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मंत्री, अधिकारी, उद्योजक उपस्थित राहणार असल्याची माहिती मंत्री उदय सांमत यांनी यावेळी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button