breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

मोठी बातमी : प्रभाग रचनेचा आराखडा सोमवारी निवडणूक आयोगाला सादर करणार!

इच्छुकांचे देव पाण्यात : सर्वपक्षीय नेत्यांची उत्सुकता शिगेला

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पुढीलवर्षी होणा-या निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाकडून प्रभाग रचनेचा कच्चा प्रारुप आराखडा तयार करण्याचे काम वेगात सुरु आहे. काम अंतिम टप्प्यात असून येत्या सोमवारी (दि.6) आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे. नवा प्रभाग कसा असणार, त्याला कोणता भाग जोडला असेल, कोणता भाग वगळला असेल याबाबत नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार आणि नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 25 ऑगस्ट 2021 रोजी एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. त्यानंतर राज्य मुंबई वगळता 17 महापालिकांच्या निवडणुका तीनसदस्यीय पॅनल पद्धतीने घेण्याचा निर्णय 30 सप्टेंबर रोजी घेतला. त्यानंतर राज्य सरकारने राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महापालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय 27 ऑक्टोबर रोजी घेतला. त्यानुसार नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश 3 नोव्हेंबर 21 रोजी महापालिकेला दिले.

प्रभाग रचनेचा कच्चा प्रारुप आराखडा 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले. परंतु, या मुदतीत महापालिका प्रशासन आराखडा तयार करु शकले नाही. निवडणूक गट (ब्लॉक) फोडण्यास निवडणूक आयोगाची मनाई असल्याने प्रभाग रचनेत मोठा अडसर निर्माण झाला. मुदतीत प्रभाग रचनेचे केवळ 30 ते 35 टक्के काम पूर्ण झाले. त्यामुळे महापालिकेने प्रभाग रचनेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार आयोगाने 5 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आणि 6 डिसेंबरला आराखडा सादर करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर महापालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी आराखडा तयार करण्याच्या कामावर फोकस केला. चार दिवसात आराखड्याचे काम जवळपास 80 टक्क्यांपर्यंत नेले. केवळ 20 टक्के काम बाकी आहे. दोन दिवसात आराखडा पूर्ण केला जाईल. सोमवारी निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात असून सोमवारी आराखडा निवडणूक आयोगाला सादर केला जाईल, असे निवडणूक विभागातील अधिका-यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button