ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघ अंगावर झेप घेणार, तितक्यात…; १४ वर्षांच्या मुलाने लढविली ही शक्कल अन् वाघोबा…

चंद्रपूर| शेळ्या चराईसाठी जंगलात गेलेल्या मुलाने मोबाईलवर गाणे वाजवून वाघाला पिटाळून लावल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथे घडली आहे. प्रथमदर्शनी असे घडले असेल असे कुणालाही वाटणार नाही; मात्र ही सत्य घटना असून या मुलाचे गावात कौतुक होत आहे. वाघाला पिटाळून लावण्याची ही शक्कल लढवणाऱ्या मुलाचे नाव गुणवंत लोडे असे आहे.

आवळगावातील गुणवंत लोडे हा इयत्ता नववीत शिकतो. सध्या शाळेला सुट्या लागल्याने तो घरच्या शेळ्या चराईसाठी जंगलाकडे घेऊन गेला होता. शेळ्या चरायला सोडून तो तलावाच्या काठाशी एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसला. काही वेळाने त्याला कंटाळा आल्याने गाणे ऐकण्यासाठी त्याने मोबाईल काढला. गाणे सिलेक्ट करून मान वर करून बघताच समोर भलेमोठे वाघोबा दिसले. एरव्ही वाघ असा समोर दिसला की, कुणाचीही दातखिळी बसते. पण हा मुलगा जराही डगमगला नाही. तो त्या वाघाकडे बघत-बघत उठून उभा राहिला. वाघ आणि मुलगा दोघेही एकमेकाकडे बघत उभे होते.

त्याचक्षणी गुणवंतने सिलेक्ट केलेले गाणे मोबाइलवर वाजायला लागले. हे गाणे ऐकून वाघ थबकला. काहीवेळ स्तब्ध राहिलेल्या वाघाने नंतर जंगलाकडे कूच केली. हा मुलगा इथेच थांबला नाही, तर त्याने वाघाच्या मागे जात मोबाईल फेकून मारला. वाघ जंगलात दिसेनासा झाल्यावर या मुलाने घरी हा किस्सा सांगितला. तेव्हा सारेच अवाक् झाले. पण मुलगा मोठ्या संकटातून वाचला, याचे समाधान घरच्यांच्या चेहऱ्यावर होते.

ब्रम्हपुरी तालुक्यात अनेक गावे जंगलालगत असून, तिथे हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. यातून मानव-वन्यजीव संघर्ष वारंवार होत असतो. मात्र प्रत्येकाचे नशीब गुणवंतसारखे नसते. गुणवंतच्या या धाडसाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button