breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘अग्निपथ’ योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून महाराष्ट्रभर आंदोलने

चंद्रपूर : अग्निपथ योजनेविरोधात राज्यात तरूणाईमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. राज्यात विविध ठिकाणी अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. याचदरम्यान, चंद्रपुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन करत ही योजना निव्वळ धूळफेक करणारी असल्याचा आरोप केला आहे. तसचं ही एकप्रकारे बेरोजगारांची थट्टा असल्याची टीका देखील करण्यात आली आहे. शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर जे ७५ टक्के तरुण युवक समाजात वावरणार आहे ते सुद्धा एकप्रकारे समाजाकरिता धोकादायकच ठरू शकते. सैन्याच्या मनोबलावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेत केंद्र सरकारने ही योजना मागे घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे. २०१४ च्या निवडणूकांवेळी मोदी सरकारने दरवर्षी २ करोड रोजगार देणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु २ लाख तरुणांनाही रोजगार उपलब्ध करून देण्यात आला नाही. काही महिन्यांपूर्वी १ वर्षात १० लाख रोजगार देणार असल्याचे पंतप्रधान यांनी जाहीर केले होते. अशा धूळफेक करणाऱ्या घोषणा करून एकप्रकारे बेरोजगारांची थट्टा चालविण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. अग्निपथ ही योजना अमलात आणून तरुणांच्या भविष्याशी केंद्र सरकार खेळत आहे. फक्त ४ वर्षे सैन्यदलात सेवा करण्याची संधी देऊन पुन्हा बेरोजगारांच्या खाईत त्या युवकाला केंद्र सरकार ढकलणार आहे.

शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर जे ७५ टक्के तरुण युवक समाजात वावरणार आहे ते सुद्धा एकप्रकारे समाजाकरिता धोकादायकच ठरू शकते. या योजनेत ४ वर्षांच्या सेवा कालावधीनंतर शाश्वत रोजगाराचे कुठलेही ठोस पाऊल केंद्र सरकार उचलणार नसल्याने यातून बाहेर पडल्यानंतर बेरोजगारीच्या विळख्यात तरुणाई पुन्हा एकदा अडकेल ही भीती यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने व्यक्त केली. सैन्य भरतीसाठी इच्छुक असलेल्या युवकांवर, तसेच सैन्याच्या मनोबलावर या योजनेचा होणारा विपरीत परिणाम लक्षात घेत केंद्र सरकारने सदर योजना मागे घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलनादरम्यान केली आहे. तर दुसरीकडे, केंद्राच्या या अग्नीपथ कायद्याविरोधात आज अकोल्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखली आहे. आज शहरातील गौतमनगर परिसरात या कार्यकर्त्यांनी जम्मूतावी-नांदेड हमसफर एक्सप्रेस रोखल्याने पोलीस यंत्रणेची मोठी पळापळ झाली. यावेळी केंद्राच्या कायद्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड घोषणाबाजी करीत ८ मिनिटं रेल्वे रोखून धरली. मात्र, या आंदोलनाचा रेल्वे वाहतूकीवर कोणताही परिणाम झाला नाही.

अग्निपथ योजनेच्या विरोधात संपूर्ण देशात पेटलेल्या आंदोलनाचा चटका भंडारा जिल्ह्याला सुद्धा बसला. आज युवक काँग्रेसच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर चक्काजाम आंदोलन केलं गेलं. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याने अर्धा तास वाहतुकीची कोंडी झाली. पोलिसांनी सूचना दिल्यावरही आंदोलनकर्ते न थांबल्यामुळे पोलिसांना बळाचे वापर करावे लागले. यादरम्यान, ज्या ५० कार्यकर्त्यांना अटक केली होती त्यांची नंतर सुटका करण्यात आली. अल्पकालीन सैन्यभरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी तरुण रस्त्यावर उतरले असून आंदोलन करत आहेत. वाशिममध्ये देखील आयोजित मोर्च्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलक तरुणांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक तरुण जखमी झाले. लष्करात भरती होऊ इच्छिणारे तरुण या योजनेविरोधात संताप व्यक्त करत आहेत. वाशिम मध्येही या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, व इतर सामाजिक राजकीय संघटनांनी महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button