breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमराठवाडाराजकारण

राज ठाकरेंच्या सभेवर होती पोलिसांची करडी नजर; त्या १६ अटींचे पालन झाले का?, पोलीस आयुक्त म्हणाले…

औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची जाहीर सभा शांततेत पार पडली. या सभेत त्यांनी मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. मशिदींवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात आपण सरकारला अल्टिमेटम दिला असून मशिदींवरील भोंगे उतरवले न गेल्यास ४ तारखेपासून आपण ऐकणार नाही. तसे झाल्यास हिंदू बांधवांनी दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावावा असे आवाहन ठाकरे यांनी हिंदूंना केले आहे. राज ठाकरे यांच्या आजच्या सभेला पोलिसांनी काही अटी आणि नियमांचे बंधन घालून परवानगी दिली होती. म्हणूनच ठाकरे यांच्या आजच्या सभेवर पोलिसांची करडी नजर होती. आजच्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचा भंग झाला किंवा कसे याबाबत प्रसारमाध्यमांनी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता (Nikhil Gupta) यांना प्रश्न विचारला. त्यावर या सभेत किती अटी पाळल्या गेल्या आणि किती अटींचे उल्लंघन झाले याचा अभ्यास करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे सूचक विधान औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी केले आहे. (police will study whether the conditions given by police were violated in raj thackerays meeting)

औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेसाठी एकूण १६ नियमांची नोटीस जारी केली होती. राज ठाकरे यांच्या सभेत त्यांना देण्यात आलेल्या अटींचे उल्लंघन झाले किंवा नाही याबाबत मला माहिती नसून त्यांच्या भाषणाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी एका वृत्तवाहिनीला दिलल्या मुलाखतीत म्हटले आहे. राज ठाकरे यांची सभा शांततेत पार पडल्याबद्दल गुप्ता यांनी पोलिसांचे कौतुक केले.

राज ठाकरे यांच्या सभेसाठी गेल्या काही दिवसांपासून पोलिसांचे नियोजन सुरू झाले होते. सभेसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांचे मार्ग कोणते असावेत याचा विचार पोलिसांनी केला होता. कार्यकर्त्यांची सभेला बसण्याची पद्धतही पोलिसांनी आधीच ठरवली होती. त्याच प्रमाणे सभेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था कोठे करावी, तसेच पार्किंगच्या ठिकाणापासून सभास्थळी येण्याचा मार्ग काय असावा याबाबतही नियोजन करण्यात आले होते.

त्या प्रमाणे संपूर्ण सभेवर लक्ष ठेवता यावे यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. सभा सुरू असताना कार्यकर्त्यांमध्ये एखाद्या ठिकाणी कुठे हालचाल किंवा गडबड लक्षात आली तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून तेथील परिस्थितीचा आढावा घेत ती परिस्थिती हाताळण्याच्या सूचनाही पोलिसांना केल्या जात होत्या, अशी माहितीही आयुक्त गुप्ता यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button