ताज्या घडामोडीमुंबई

मंदिरांचा इतिहास जाणीवपूर्वक दडवला! सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

मुंबई| नागरिकांनी प्रेरणा घेऊ नये, यासाठी देशातील मंदिरे आणि पराक्रमांचा इतिहास जाणीवपूर्वक दडविण्यात आला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी येथे केले.

दीपा मंडलिक लिखीत ‘पराक्रमी हिंदू राजांची अद्वितीय मंदिरे’ पुस्तकाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ पुरातत्व वेत्ते आणि मूर्तीशास्त्र व मंदिरांचे अभ्यासक डॉ. गो. ब. देगलूरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. राजेंद्र प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

एका मंदिरासाठी (अयोध्या) प्रदीर्घकाळ आंदोलन का करावे लागले, असा प्रश्न करून सरसंघचालक भागवत म्हणाले, ‘‘पक्ष आणि सर्व भेद विसरून सर्वानी एकजूट दाखविल्याने हे मंदीर उभे राहिले. मंदिरांचा व पराक्रमांचा इतिहास आधीही दडविला गेला आणि स्वातंत्र्योत्तर काळातही तीच परंपरा सुरू राहिली. शालेय व महाविद्यालयीन पुस्तकांमधूनही तो फारसा उलगडला नाही. पण, संशोधक, लेखक आणि इतिहासकारांनी तो लोकांपर्यंत पोचविला. प्राचीन मंदिरे ही पराक्रम, शास्त्र व ज्ञानाची साक्ष देणारी होती. केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिरापासून देशभरातील अनेक मंदिरे ही स्थापत्यशास्त्र आणि अन्य क्षेत्रांतील भारतीयांचे ज्ञान किती प्रगत होते, याचा प्रत्यय देतात.

मंदिरांमध्ये श्रध्देने गेल्यावर ब्रम्हभावनेचा अनुभव येतो. मंदिरे आध्यात्मिक अनुभूती देणारी आणि मोक्षाप्रत नेणारीही होती. मंदिरांशी समाजजीवनही निगडीत होते. मंदिरांमध्ये पाठशाळा होत्या, व्यापार विषयक बाबी होत्या. परिसरातील लोकांचे अर्थार्जनही होत होते. पराक्रमी हिंदू राजांनी भव्य मंदिरे उभारली, पण ती स्वत:साठी न ठेवता समाजासाठी ठेवली. मंदिरांची संपत्तीही जपली, असे भागवत यांनी सांगितले. भारतीय संस्कृती ही जगातील श्रेष्ठ संस्कृती आहे. मूर्ती आणि मंदिरे हे भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. इजिप्त, इटली, इराणसह अन्य देशांमध्येही मंदिरे होती, आता ती कुठे आहेत? वस्तुसंग्रहालयातूनच त्यांचा प्रत्यय येतो, असे डॉ. देगलूरकर म्हणाले.

मंदिरांमधून राष्ट्रदेवतेचेही दर्शन’

मंदिरांमधून राष्ट्रदेवतेचेही दर्शन घडते, असे मोहन भागवत म्हणाल़े पराक्रमी हिंदू राजांनी भव्य मंदिरे उभारली, पण ती स्वत:साठी न ठेवता समाजासाठी उघडी ठेवली, असेही भागवत यांनी सांगितले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button