ताज्या घडामोडीपुणे

सावित्रीबाई फुले यांच्या पुतळय़ाचे १४ फेब्रुवारीला अनावरण

पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण १४ फेब्रुवारीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी विद्यापीठ परिसरातील कार्यक्रमस्थळाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

विद्यापीठात झालेल्या बैठकीला कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते. सामंत म्हणाले, की विद्यापीठात साकारण्यात आलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते १४ फेब्रुवारी रोजी अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन पद्धतीने, तर कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित राहतील. देशात प्रथमच सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनासाठी तीन कोटींचा निधी देण्यात येईल. त्यासाठी कुलगुरूंना प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

वसतिगृह सुरू करण्यास मान्यता

राज्यातील महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून, करोना स्थितीचा आढावा घेऊन वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. वसतिगृहाच्या क्षमतेच्या २५ टक्के किंवा ५० टक्के किंवा किती क्षमतेने प्रवेश देऊन वसतिगृह सुरू करायचे याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा, असे सामंत यांनी सांगितले.

ऑफलाइन परीक्षेची तयारी करावी

करोना काळात ऑनलाइन परीक्षा ही तात्पुरती व्यवस्था होती. ऑनलाइन परीक्षा हा कायमस्वरुपी उपाय असू शकत नाही. आता महाविद्यालये सुरू झाल्याने ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यासंदर्भात आढावा घेतला जाणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देण्याची मानसिक तयारी करावी, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button