breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

प्रवाशांना विवस्त्र करून लैंगिक चाळे, नंतर शेणही खायला लावायचे, सोलापूरमध्ये पोलिसांकडून विकृत टोळी जेरबंद

सोलापूर |

सोलापूर शहर पोलिसांनी एका विकृत टोळीला जेरबंद केले आहे. ही टोळी सोलापूरमध्ये रस्त्याने रात्री येणाऱ्या जाणाऱ्या एकट्या दुकट्या व्यक्तींना अडवून पिस्तूल आणि गुप्तीचा धाक दाखवून लूटमार करायची. याशिवाय रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना चक्क विवस्त्र करून लैंगिक चाळे केले जायचे आणि शेण खाण्यास भाग पाडले जायचे. इतकंच नाही, तर त्याचे व्हिडिओही चित्रण समाज माध्यमातून प्रसारीत केला जात होता. शहरातील जुना तुळजापूर नाका ते रूपाभवानी मंदिर रस्त्यावर असे प्रकार घडायचे.

या टोळीतील चौघा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व धारदार गुप्तीसह चार स्मार्टफोन आणि दोन दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. सागर अरूण कांबळे (वय २२, भीमविजय चौक, न्यू बुधवार पेठ, सोलापूर), बुध्दभूषण नागसेन नागटिळक (वय २६, रा. आंबेडकर उद्यानाजवळ, न्यू बुधवार पेठ), सतीश ऊर्फ बाबुला अर्जुन गायकवाड (वय २५, रा. मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर) आणि अक्षय प्रकाश थोरात (वय २६, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, न्यू बुधवार पेठ, सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या विरूध्द जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.

  • प्रवाशांना विवस्त्र करून लैंगिक चाळे करणारी विकृत टोळी

पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी या प्रकरणी दिलेल्या माहितनुसार, जुना तुळजापूर नाका ते रूपाभवानी मंदिर रस्त्यावर रात्री-अपरात्री येणाऱ्या-जाणाऱ्या एकट्या-दुकट्या व्यक्तींना गाठून ही टोळी त्यांना पिस्तूल वा गुप्तीचा धाक दाखवयची. तसेच मारहाण करून लूटमार करायची. एवढेच नव्हे तर पीडित व्यक्तींना अक्षरशः विवस्त्र करून त्यांच्याशी लैंगिक चाळे केले जात. त्याहीपेक्षा कहर म्हणजे पीडित व्यक्तींचा अमानुष छळ करून त्यांना जनावरांचे शेण खाण्यासही भाग पाडले जात असे.

  • अत्याचाराचं स्मार्ट फोनद्वारे संपूर्ण चित्रिकरण करून सोशल मीडियावर पोस्ट

आरोपींची टोळी या सर्व अत्याचाराचं स्मार्ट फोनद्वारे संपूर्ण चित्रिकरण करून ती चित्रफित समाज माध्यमातून प्रसारीत करत असे. या टोळीची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे फौजदार केतन मांजरे यांनी तेथे सापळा रचला. यात ही संशयित टोळी सापडली. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे गावठी पिस्तूल व तीक्ष्ण गुप्तीसह ४ स्मार्ट फोन सापडले. स्मार्ट फोनमधील चित्रफिती पडताळून पाहिल्या असता याच टोळीच्या अमानवी कृत्यांचे कारनामे पाहायला मिळाले.

पोलीस आयुक्त हरीश बैजल व उपायुक्त वैशाली कडूकर यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त डॉ. संतोष गायकवाड, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम, पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. फौजदार केतन मांजरे, हवालदार आबा थोरात, सुरेश जमादार, अतुल गवळी, खाजप्पा अरेनवरू, थिटे, राजेश घोडके, स्वप्नील कसगावडे, गोपाळ शेळके, दत्ता काटे, बाळू माने आदींच्या पथकाचा या कारवाईत सहभाग होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button