ताज्या घडामोडीमुंबई

एसटी विलिनीकरणाची आजतरी परिस्थिती नाही; पटोलेेंचे विधान

मुंबई |  गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत हायकोर्टाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांचे राज्य सरकारच्या सेवेत विलिनीकरण करता येणार नाही. विलिनीकरणाचा भार सरकार सोसू शकत नाही, असा अहवाल मांडला होता. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून राज्यभरात संप पुकारलेल्या एसटी कामगारांना मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राज्य सरकारची आर्थिक स्थिती योग्य नसल्याने आजतरी एसटी विलिनीकरणाची परिस्थिती नाही असे विधान केले आहे.

नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, एसटीच्या विलिनीकरणावरचा अहवाल आला आहे. मात्र, भाजप आंदोलकांच्या मागे राहून कामगारांना उपाशी ठेवण्याचे काम करत आहे. त्यांची सत्ता असताना विलिनीकरण केले नाही. आज राज्य सरकारची आर्थिक स्थिती योग्य नसल्याने विलिनीकरणाची परिस्थिती नाही. मात्र, 2024 नंतर आम्ही कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. विलिनीकरणासंदर्भातली भूमिका ठामपणे मांडू, असे म्हटले.

पटोले पुढे म्हणाले की, मुंबईतील धारावी झोपडपट्टीचे पुनर्वसन व्हावे हे स्वप्न होते. मात्र, त्याला भ्रष्टाचाराचे गालबोट लागले आहे. रेल्वेच्या 45 एकर जागेसाठी 800 कोटी फडणवीसांनी दिले. मात्र, अद्याप काहीही झालेले नाही. रेल्वे जागा देण्यास तयार नाही, ना ते पैसे परत द्यायला तयार नाही. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. शहराला घाण करण्याचे काम भाजप करत आहे. याबाबत या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहे. धारावी घोटाळा प्रकरणी उद्देश काय होता? यासाठी एसआयटी चौकशीची करावी, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. सोबतच ईडी, सीबीआयनेही चौकशी करावी, असेही पटोले म्हणाले.

ओबीसी आरक्षणावर बोलताना पटोले म्हणाले की, भाजप ओबीसी समाजाचा शत्रू आहे. आपल्यावरचे आरोप मविआवर ढकलत आहे. 2011 मध्ये मनमोहन सिंह यांनी इम्पेरीकल डाटा गोळा करून ठेवला आहे. मात्र, तो डाटा देत नाहीत, ना उत्तर देतात. त्यामुळे अनेक त्रुटी राहतात. मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रात हा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपला एक प्रश्न आहे की, केंद्राने हस्तक्षेप केला, तर हा प्रश्न सुटू शकतो. मात्र, भाजपला आरक्षण द्यायचे नाही. सोबतच एससी, एसटी आरक्षण देखील संपवण्याचा घाट आहे. मंडल आयोगाच्या शिफारशी रद्द करायचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button