“पिकलेल्या दाढीचे केस रंगवण्याची वेळ…”; विराटने सांगितले कसोटी निवृत्तीचे कारण

Virat Kohli | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि रनमशीन विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर करत जगभरातील चाहत्यांना धक्का दिला होता. भारत-इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान कोहलीच्या अनुपस्थितीची चर्चा सातत्याने होत आहे. दरम्यान, निवृत्तीच्या तब्बल दोन महिन्यांनंतर विराट कोहलीने प्रथमच याबाबत मौन सोडले आणि आपल्या निर्णयामागील कारण स्पष्ट केले.
लंडनमध्ये एका कार्यक्रमात बोलताना कोहली म्हणाला, “मी आता दोन दिवसांपूर्वीच माझी दाढी रंगवली. पिकलेल्या दाढीचे केस रंगवण्याची सारखी वेळ येते तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की निरोपाची वेळ झाली आहे.” त्याच्या या वक्तव्यातून वय आणि बदलत्या जीवनशैलीचा संदर्भ देत त्याने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे सूचित होते. यासोबतच, त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) यापूर्वीच आपल्या निर्णयाची माहिती दिली होती, परंतु BCCI ने त्याला निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले होते.
हेही वाचा : गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल कोसळला, अनेक वाहनं नदीत कोसळली
कोहलीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी त्याच्या निर्णयाचे स्वागत केले, तर काहींनी त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची विनंती केली. कोहलीच्या निवृत्तीमुळे भारतीय कसोटी संघात एक पोकळी निर्माण झाली आहे, आणि आता संघ व्यवस्थापन नव्या खेळाडूंना संधी देण्याच्या तयारीत आहे.





