तीन दिवस शहर रामभरोसे? आयुक्तांसह, वरिष्ठ अधिकारी शहर धोरणावर चर्चेसाठी शहराबाहेर !
महापालिका प्रशासनचा प्रताप: शहर धोरणावर चर्चेसाठी आठ लाखांची उधळपट्टी

पिंपरी- चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्यासह आदी 50 वरिष्ठ अधिकारी मुळशीतील ताम्हिणी घाटात असणाऱ्या गरुडमाचीवर शहर धोरणावर चर्चा करण्यासाठी रवाना होणार आहेत.
तीन दिवसांच्या या निवासी कार्यशाळेचे दि.२८ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या तीन दिवसांच्या कार्यशाळेसाठी तब्बल ८ लाख ५४ हजार ३२० रुपयांची उधळपट्टी करण्यात येणार आहे
या निवासी कार्यशाळेसाठी आयुक्तांसह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी शुक्रवारी (दि. २८) दुपारी दोन नंतर ताम्हिणी घाटातील गरुडमाचीकडे रवाना होणार आहेत हे ठिकाण शहरापासून साधारण ७५ किलोमीटर अंतरावर आहे. तीन दिवस अधिकारी येथे मुक्कामी असणार आहेत. त्यामुळे तीन दिवस शहर रामभरोसे राहणार आहे.
हेही वाचा – अमेरिकेची संशोधनासाठी पुण्याला पसंती! विविध संस्थांसोबत भागीदारीचे पाऊल
कार्यशाळा कशासाठी ?
स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी पर्यंत पोहोचलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापनेस २०३२ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमिताने महापालिकेने “व्हिजन ५० शहर धोरण” हा उपक्रम हाती घेतला आहे. पिंपरी चिंचवड शहराचे नागरिकरण या पुढील काळात प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. आजमीतिला शहराची लोकसंख्या चाळीस लाखांच्या टप्प्यावर आहे. आगामी काळात पाणी, रस्ते,आरोग्य या मूलभूत गरजांशिवाय शहराला आणखी काय हवे आहे ?याची घडी कशी बसवता येईल? मूलभूत समस्या व्यतिरिक्त शहराच्या गरजा कशा वाढणार आहेत यावर साधकबाधक चर्चा करण्यात येणार आहे. त्यावरून शहर विकासाचे धोरणही ठरवले जाईल. यासाठी तीन दिवसांच्या निवासी कार्यशाळेचे दि.२८ दि.२ मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेवर कामगार कल्याण विभागाच्या लेखाशिर्षावरील ८ लाख ५४ हजार ३२० रुपयांची उधळपट्टी करण्यात येणार आहे.