Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

महिला टी-२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचा धमाका! पहिल्या सामन्यात इंग्लंडचा ३८ धावांनी पराभव

INDW vs ENGW | महिला टी-२० विश्वचषकासाठी इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय महिला संघाने आपल्या दौऱ्याची सुरुवात अत्यंत दिमाखात केली आहे. विश्वचषकापूर्वी खेळवल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने यजमान इंग्लंडचा ३८ धावांनी धुव्वा उडवला. या दणदणीत विजयामुळे टीम इंडियाने मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरला या सामन्यात विश्रांती देण्यात आल्यामुळे स्मृती मानधनाने संघाचे नेतृत्व केले आणि पहिल्याच प्रयत्नात संघाला शानदार विजय मिळवून दिला.

जेमिमा-यास्तिकाची विक्रमी भागीदारी

नाणेफेक जिंकून इंग्लंडने भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. मात्र, भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. पहिल्याच षटकात कर्णधार स्मृती मानधना (०) आणि शफाली वर्मा (२) स्वस्तात बाद झाल्या. २ बाद २ अशा बिकट परिस्थितीतून जेमिमा रॉड्रिग्स आणि यास्तिका भाटिया यांनी संघाचा डाव केवळ सावरलाच नाही, तर इंग्लंडच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. या दोघींनी पहिल्या ६ षटकांत ७३ धावा कुटत पॉवरप्लेमधील भारताची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.

हेही वाचा

म्युनिकमध्ये भारताचा डंका! ईशा सिंगने ४३ गुणांचा नवा जागतिक विक्रम रचत जिंकलं सुवर्णपदक

दोन वर्षांनंतर टी-२० संघात पुनरागमन करणाऱ्या यास्तिका भाटियाने ४० चेंडूंत ५४ धावांची खेळी केली. तर दुसरीकडे जेमिमाने अवघ्या ४० चेंडूंत ६९ धावांची (स्ट्राईक रेट १७२.५०) वादळी खेळी साकारली. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी १२६ धावांची ऐतिहासिक भागीदारी रचली. हा महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या विकेटसाठी भारताकडून सर्वोच्च भागीदारीचा नवा विक्रम ठरला आहे. यापूर्वी २०१९ मध्ये वेदा कृष्णमूर्ती आणि जेमिमाने वेस्ट इंडिजविरुद्ध ११७ धावा जोडल्या होत्या. अखेरच्या षटकांत दीप्ती शर्माने १३ चेंडूंत २२ धावांची वेगवान खेळी केल्यामुळे भारताने २० षटकांत ७ बाद १८८ धावांचा डोंगर उभा केला.

पदार्पण करणाऱ्या नंदिनी शर्माची भेदक गोलंदाजी

१८९ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवातही खराब झाली. भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौडने इंग्लंडच्या सोफिया डंकले आणि अ‍ॅलिस कॅप्सी या दोन्ही सलामीवीरांना ३७ धावांच्या आत बाद करून इंग्लंडला मोठे झटके दिले. इंग्लंडकडून विकेटकीपर एमी जोन्सने ४८ चेंडूंत ६७ धावांची झुंजार खेळी करत सामना रंगवण्याचा प्रयत्न केला, मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या भारताच्या नंदिनी शर्माने तिला बाद करत इंग्लंडच्या आशा धुळीस मिळवल्या.

नंदिनीने त्यानंतर डॅनी गिब्सन आणि इस्सी वोंग यांनाही बाद करत इंग्लंडची खालची फळी उध्वस्त केली. तिने आपल्या पहिल्याच सामन्यात ४ षटकांत ३४ धावा देऊन ३ महत्त्वपूर्ण बळी घेतले. क्रांती गौडने २ बळी मिळवले, तर श्री चरणी आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे इंग्लंडचा संघ २० षटकांत ८ बाद केवळ १५० धावाच करू शकला. उत्कृष्ट फलंदाजी करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button