रॉबिन मिंजने मुंबई इंडियन्सच्या संघात स्थान मिळवलं
2025 चं आयपीएल गाजवण्यासाठी सज्ज

मुंबई : आर्थिक परिस्थिती नसताना क्रिकेटमध्ये करियर करण्याचा विचार करणे म्हणजे सोपं राहिलेलं नाही. तरी देखील आजवर अनेक जण घरच्या बिकट परिस्थितीशी झुंज देत क्रिकेटच्या जगात नाव कमावताना दिसले आहेत. आयपीएलमधील एखाद्या संघात आपले स्थान पक्के करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. स्वत:चं घर खापराचं असताना घरची परिस्थिती बिकट असताना आणि जेवण बनवण्यासाठी आणलेली लाकडं घेऊन क्रिकेटचा सराव करणारा खेळाडू आता आयपीएलच्या जगात पोहोचलाय. आयपीएलच्या 18 व्या हंगामात तो आता मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे.
झारखंडच्या गुमला जिल्ह्याने भारतीय क्रीडा क्षेत्राला अनेक चांगले खेळाडू दिले आहेत. फुटबॉल, हॉकी ते एथलेटिक्समध्ये येथील अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकताना दिसले आहेत. मात्र, या जिल्ह्यातून क्रिकेटमध्ये कोणताच खेळाडू पुढे आला नव्हता. आता या जिल्ह्याचं क्रिकेटचं स्वप्न देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. रॉबिन मिंजने आता मुंबई इंडियन्सच्या संघात स्थान मिळवलं असून तो 2025 चं आयपीएल गाजवण्यासाठी सज्ज झालाय.
आयपीएल 2024 च्या हंगामात रॉबिन मिंज याचं नाव पहिल्यांदा चर्चेत आलं होतं. सिलम पांदनटोलीमधील रायडीह प्रखंड या छोट्या गावातून आयपीएलच्या जगात पोहोचण्याचा पराक्रम रॉबिन मिंज याने करुन दाखवलाय. आदिवासी कुटुंबातून येणाऱ्या रॉबिनच्या या यशाचं संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात कौतुक करण्यात येत आहे. एका आदिवासी खेळाडूने क्रिकेटच्या मोठ्या लीगमध्ये स्थान मिळवणे ही काय सोपी गोष्ट नाही. मात्र, हा प्रवास रॉबिनने त्याच्या मेहनतीने यशस्वी करुन दाखवलाय.
हेही वाचा – “आक्रमक मानसिकता असलेले लोक भारतासाठी धोकादायक”; औरंगजेब वादावर RSS सरचिटणीसांचे विधान
रांचीमध्ये घेतलं क्रिकेटचं ट्रेनिंग
रॉबिन मिंज एका मुलाखतीत म्हणाला, लहानपणापासूनचं क्रिकेटमध्ये करिकर करायचं, अशी रॉबिनची इच्छा होती. रॉबिन 7-8 वर्षांचा होता, तेव्हापासूनच त्याला क्रिकेटचं वेड होतं. आमचा त्याच्यावर विश्वास आहे आणि आशीर्वाद आहे की त्याने देशासाठी क्रिकेट खेळावं. रॉबिनचे वडिल जेवियर मिंज हे सैन्यात काम करत होते. तेव्हा आम्ही रांचीला गेलो होतो. तेव्हा रॉबिनने तेथेच शिक्षण आणि सोबत क्रिकेटचा सराव सुरु केला होता.
जेवण्यासाठी आणलेली लाकडं घेऊन क्रिकेटचा सराव
रॉबिनचे गावकरी लालमोहन लोहरा म्हणाले, रॉबिने जेवण्यासाठी आणलेली लाकडं घेऊन गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळलंय. गावातील मुलं प्लास्टिक आणि टेनिसच्या बॉलने क्रिकेट खेळायचे. त्यांच्यामध्येच रॉबिन सराव करायचा. आता आयपीएलला सुरुवात होणार आहे, आमचा रॉबिन मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. आम्हाला आशा आहे की, तो चांगली कामगिरी करेल. मोठे षटकार मारेन. पुढे तो भारतीय संघात स्थानही मिळवेल.
मागील वर्षी अपघात झाल्याने खेळू शकला नाही आयपीएल
गेल्या आयपीएल लिलावात रॉबिन मिंजला गुजरात टायटन्स संघाने 3 कोटी 60 लाख रुपयांना खरेदी केले होते. पण, दुर्दैवाने रस्ते अपघातात झालेल्या दुखापतीमुळे रॉबिनला गेल्या वर्षीच्या आयपीएल हंगामात खेळता आले नव्हते. यावेळी तो नक्कीच खेळू शकेल, अशी सर्वांना आशा आहे. यावेळी आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सने रॉबिनसाठी 65 लाखांची बोली लावली आहे. रॉबिन मिंज स्फोटक फलंदाजी आणि यष्टिरक्षणासाठी ओळखला जातो. मिंज हा पहिला आदिवासी क्रिकेटपटू आहे जो आयपीएल खेळताना दिसणार आहे.