नागपूर परिसरातील हिंसाचाराचा मास्टरमाईंड एमडीपीचे अध्यक्ष फहीम खानला अटक
कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनिअर आणि यू-ट्यूबर मोहम्मद शहजाद खान यांनाही अटक

नागपूर : महाल परिसरात हिसांचारानंतर मास्टर माईंड म्हणून दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी मायनॉरिटी डेमोक्रेटिक पक्षाचा अध्यक्ष फहीम खान याला अटक केली. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. शनिवारी याप्रकरणी आणखी दोघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.
यात मायनॉरिटी डेमोक्रेटिक पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनिअर आणि यू ट्यूबर पत्रकार मोहम्मद शहजाद खान यांचा समावेश असून त्यांना अटक केल्याची माहिती आहे. हिसाचारानंतर अनेक वस्त्यांमध्ये ‘कर्फ्यू’ कायम आहे. विशेष म्हणजे महाल आणि इतवारी या सर्वात मोठ्या बाजारपेठ पाच दिवसांपासून बंद आहे.
शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचा आढावा घेत पोलिसांना सूचना केल्या. दुसरीकडे काँग्रेसच्या सत्य शोधन समितीच्या वतीने हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी नागपुरात दाखल झाली. दरम्यान भाजपच्या नेत्यांनी हा हिंसाचार पूर्वनियोजित होता, असा आरोप केला आहे.
हेही वाचा – “आक्रमक मानसिकता असलेले लोक भारतासाठी धोकादायक”; औरंगजेब वादावर RSS सरचिटणीसांचे विधान
एका समुदायानेसुद्धा या घटनेचा निषेध नोंदवित औरंगजेबाच्या कबरीशी आमचे देणेघेणे नाही, ती उखडून टाकायची असेल तर उखडून टाका. मात्र, आम्हाला देशद्रोही ठरवू नका, अशी भूमिका घेतली होती. या घटनेमागे बांगलादेशातील रोहिंग्याचे कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सोशल मीडियावरून समाजकंटकांना चिथावणी देण्यात आल्याचे सांगण्यात येते. सायबर पोलिसांनी याप्रकरणी चार गुन्हे दाखल केले होते. त्यातूनच आता दोघांना अटक करण्यात आली. या दोघांनीही घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल केल्याची माहिती आहे. याशिवाय हमीदने यापूर्वीही अनेकदा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यात. याशिवाय घटनेनंतरही त्याने पोस्ट व्हायरल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
१९० व्हिडीओ डिलीट
हिसांचारानंतर सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट टाकण्यात आल्या. त्या विरोधात सायबर पोलिसांनी मोहीम सुरू करून तब्बल अडीचशे आक्षेपार्ह व्हिडीओ शोधून काढले. यातील ६७ व्हिडीओच्या आधारावर चार गुन्हे दाखल केले. उर्वरित १९० व्हिडीओ विविध सोशल मिडियावरून डिलिट केले असल्याची माहिती सायबर सेलचे उपायुक्त लोहित मतानी यांनी दिली.