जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायोसिस संघांची विजयी सलामी

पुणे – अमोल बुचडे स्पोर्टस फाउंडेशन-ए, मिलेनियम स्कूल, सावला बोर्डिंग संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना सखाराम मोरे क्रीडा प्रतिष्ठान व आर्य क्रीडोद्धारक मंडळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 24 व्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली.
स. प. महाविद्यालायाच्या मैदानावर झालेल्या 17 वर्षांखालील मुलांच्या लढतीत मिलेनियम स्कूल संघाने बीव्हीबी-ए संघाला 25-22, 25-13 असे पराभूत करताना विजय साकारला. मिलेनियम स्कूल संघाकडून वेदांत कदम, स्वयम झगडे, अनिश अग्रवाल यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. बीव्हीबी-ए संघाकडून सुमेध गुंजाळ, ओम जाधव, नितेश धोत्रे व आयुष पठारे यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.
सतरा वर्षांखालील मुलांच्या गटात सावला बोर्डिंग, मुंबई संघाने कलमाडी हायस्कूल संघाला 25-1, 25-8 असे एकतर्फी पराभूत करताना विजय मिळवला. सावला बोर्डिंग संघाकडून सोहम मोरे, तन्मय घुगे, अतुल मिश्रा यांनी चमकदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. कलमाडी हायस्कूल संघाकडून अभिनव खाडिलकर, प्रांजल झोपे, सोहम कुलकर्णी यांनी चांगला खेळ केला. सतरा वर्षांखालील मुलींच्या गटात सिंबायोसिस संघाने एसपीएम संघाला 25-2, 25-10 असे एकतर्फी पराभूत करताना विजयी आगेकूच केली.
आर्या देशमुख, ऋजुल मोरे, गायत्री सांगळे, पूर्वी बोरा यांनी सिंबायोसिस संघाला विजय मिळवून दिला. तनया जोशी, नेहाल प्रभुणे व अविशा मोहोळकर यांनी चांगली लढत दिली.
चौदा वर्षांखालील मुलांच्या गटात अमोल बुचडे स्पोर्टस फाउंडेशन ए संघाने बीव्हीबी-बी संघाला 25-8, 25-15 असे पराभूत करताना विजय साकारला. अमोल बुचडे स्पोर्टस संघाकडून अविष्कार धुमाळ, अलोक तोडकर व साहिल राव यांनी संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचलला. बीव्हीबी बी संघाकडून निशांत तांबोळी शुभम जाधव व साहिल चिंचकर यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.





