Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जैन धर्मीयांना मांसाहारी ठरविणाऱ्या केंद्रीय अहवालाविरोधात समाज आक्रमक

अहमदनगर : जैन धर्मामध्ये १४.९ टक्के पुरुष व ४.३ टक्के महिला म्हणजे जवळपास २० टक्के समाज हा मांसाहारी असल्याचा अहवाल राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२१ च्या अहवालात दिला आहे. हा अहवाल अत्यंत खोटा आणि चुकीचा असल्याचे सांगत ऑल इंडिया जैन सोशल फोरम या राष्ट्रव्यापी संघटनेने या अहवालाचा जाहीर निषेध केला आहे.

जैन समाज हा अहिंसेचा पाईक असून अहिंसा ही भगवान महावीरांची शिकवण असून शाकाहार उत्तम आहार हे जैनांचे ब्रीदवाक्य आहे. असं असतानाही चुकीचा आणि खोटा अहवाल समाज माध्यमातून जनतेसमोर आणून जैन समाजाला बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र सुरू असल्याचे ऑल इंडिया जैन सोशल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजीत लुणिया यांनी म्हटले आहे.

ऑल इंडिया जय सोशल फोरमच्या वतीने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच पंतप्रधान कार्यालयात पाठवलेल्या निषेध निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, देशभरातील जैन समाज अल्पसंख्यांक असला तरी संपूर्ण देशात व विदेशात असलेल्या बांधवांची संख्या लाखोंच्या घरात आहे. असं असताना १६३२ महिला व २८० पुरुष यांना भेटून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या महिला व पुरुषांना अहवालातील कोण व कधी भेटले व यातील किमान १०० लोकांची नावे तरी अहवाल बनवणार-यांनी जाहीर करण्याचे आवाहनही लुणिया यांनी केले आहे. चार भिंतीच्या आत एसीमध्ये बसून कोणाच्या तरी दबावाखाली बनवलेला हा खोटा अहवाल जैन समाजाला बदनाम करण्यासाठीच बनवला आहे. केंद्रातील आरोग्य विभागाने अशाप्रकारचा खोटा अहवाल बनवणे व केंद्रीय मंत्रालयाने तो सार्वजनिकरित्या जाहीर करणे हे अत्यंत खेदजनक आहे. या अहवालामुळे जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१४ मध्ये जैन समाजाला अल्पसंख्यांक दर्जा दिला. त्यावेळी ऑल इंडिया जैन सोशल फोरमने प्रमुख भूमिका घेतली होती आतादेखील जैन सोशल फोरमने सर्वप्रथम या अहवालाचा जाहीर निषेध केला आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह देशातील सर्व पक्षाच्या प्रमुख यांना पाठविण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री तसेच काँग्रेसचे नेते सोनिया गांधी व राहुल गांधी यांना भेटून सविस्तर निवेदन करणार असल्याची माहिती अभिजीत लुणिया व जैन सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड प्रितम कोठाडिया (नवी दिल्ली) यांनी दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button