TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

राऊत-राणांच्या लेहच्या भेटीतही खडाजंगी, ‘तो’ प्रश्न विचारल्यानंतर राऊत नि:शब्द, राणांचा दावा

नवी दिल्ली : अमरावीच्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचे लेह लडाखमधील एकत्रित फोटो व्हायरल झाल्यानंतर तिघे नेतेही मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले. दहा दिवसांपूर्वी एकमेकांना हिणवणारे, एकमेकांवर तुटून पडणारे नेते एकाच टेबलावर बसून जेवण करत असल्याचं अनेकांना पचलं नाही. मात्र ‘महाराष्ट्राची राजकीय संस्कृती’ म्हणत घासून गुळगुळीत झालेला शब्द वापरुन दोन्ही नेत्यांनी भेटीचा तपशील सांगितला. दौऱ्यात नेमकी काय चर्चा झाली, कोणत्या विषयांवर बोलणं झालं, याबद्दल मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना राणांनी वेगळाच दावा केला. ‘आम्हाला जेलमध्ये टाकण्याएवढा आम्ही कोणता गुन्हा केला होता?’, हा प्रश्न राऊतांना विचारल्यावर ते नि:शब्द झाले. त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. हे सगळं वरच्या लेव्हलला झालं, असं म्हणत त्यांनी वेळ मारुन नेली. पण आमच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही, असा दावा नवनीत राणा यांनी केला.

शिवसेनेला शिंगावर घेणाऱ्या राणा दाम्पत्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत यांचे लेहमधील फोटो व्हायरल झाले. एकमेकांवर तुटून पडणारे ते हेच नेते का? असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला. एकाच टेबलावर बसून जेवणं, गप्पांची मैफिल, फोटोसेशन, एकत्रित फिरणं, असे राऊत-राणा दाम्पत्याचे सगळे फोटो सोशल मीडिवार व्हायरल झाले. या फोटोनंतर मीडियाने राऊत राणा दाम्पत्याला गाठून त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा राजकीय संस्कृतीचे दाखले देत दोन्ही नेत्यांनी वेळ मारुन नेली.

“मी माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी लेह लडाखच्या दौऱ्यावर गेले होते. संजय राऊत त्या दौऱ्यावर आहेत, असं म्हणून तो दौरा रद्द करण्याचा बालिशपणा मी केला नाही. कारण मी समजूतदार आहे. शेवटी एका दौऱ्यात आल्यानंतर एखाद्या विषयावर चर्चा, एखाद-दुसऱ्या विषयावर मतमतांतरे होणं स्वाभाविक आहे. पण आमच्यावर झालेला अन्यायाची गोष्ट माझ्या मनात तशीच होती. ती कायम राहिली. एकत्र जेवण जरी केलं असलं, गप्पा जरी मारल्या असल्या तरी आम्ही त्यांना एक प्रश्न विचारला. आम्हाला जेलमध्ये टाकण्याएवढा आम्ही कोणता गुन्हा केला होता?, हा प्रश्न राऊतांना विचारल्यावर ते निशब्द झाले. त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. हे सगळं वरच्या लेव्हलला झालं असं म्हणत त्यांनी वेळ मारुन नेली”, असं नवनीत राणा यांनी सांगितलं.

“आमच्यावर अन्याय झालाय, राऊतांवर अन्याय झालेला नाही. म्हणून त्यांच्या वागण्या-बोलण्यात सहजता होती. पण आम्हाला जर अवघड गेलं. कारण ज्यामुळे आम्ही जेलमध्ये गेलो, आम्हाला तुरुंगवास भोगावा लागला, ते विसरुन पुढे जाणं एवढं सोपं नव्हतं”, असंही राणा म्हणाल्या.

शिवसेनेविरोधात आमची विचारांची लढाई आहे, ती कायम असेल. आम्ही त्यांचा प्रतिकार विचारांनीच करु. भ्रष्टाचाराविरोधात आमचा लढा कायम असेल. विकासाच्या आड येणाऱ्या नेत्यांविरोधात आमची लढाई असेल, असं सांगत शिवसेनेबरोबर येणाऱ्या काळातही संघर्ष कायम राहणार असल्याचे संकेत नवनीत राणा यांनी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button