breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धक्कादायक! वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आरोग्याधिकारी डॉ. शेळके यांची आत्महत्या

नगर |

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेले समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश गोवर्धन शेळके (३६) यांनी आज, मंगळवारी  दुपारी एकच्या सुमारास उपकेंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. शेळके यांनी ‘सुसाईड नोट’ लिहून ठेवली होती. त्यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, तहसीलदार व जिल्हाधिकारी हे आपल्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे नमूद केले आहे. उपकेंद्रात लसीकरण सुरू असतानाच दुसऱ्या खोलीत आत्महत्येची ही घटना घडली.

डॉ. गणेश  शेळके हे आज उपकेंद्रात नेहमीप्रमाणे आले. काही वेळाने त्यांनी आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिसगावला बोलावले आहे, असे सांगून ते तिसगावला गेले व काही वेळाने परत आले. ते परतले त्यावेळी तणावाखाली असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत सुद्धा काढली. यानंतर शेळके हे पेन व कागद घेऊन आले व ‘टॅब’ जमा करा मी राजीनामा देणार आहे, असे उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना सांगत, उपकेंद्रातील दुसऱ्या खोलीमध्ये गेले व त्यांनी आतून दरवाजा लावून घेतला. काही वेळाने आरोग्यसेविकेने जेवणासाठी डॉ. शेळके यांना बाहेरून आवाज दिला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. या नंतर त्यांना मोबाइल केला मात्र तो शेळके यांनी न उचलल्याने आरोग्यसेविकेने खिडकीतून पाहिले असता, डॉ. शेळके यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

या घटनेची माहिती आरोग्यसेविकेने तत्काळ आपले वरिष्ठ अधिकारी व पोलिसांना कळवल्यानंतर तातडीने पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खोलीचा दरवाजा तोडून डॉ. शेळके यांचा मृतदेह खाली उतरवला. यावेळी डॉ. शेळके यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये शेळके यांनी आपल्या आत्महत्येस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे हे जबाबदार असून प्रशासन सेवेतील तहसीलदार, जिल्हाधिकारी हेही जबाबदार आहेत. अतिरिक्त कामाचा ताण, वेळेवर पगार नाही व पगार कपातीची सतत मिळणारी धमकी यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहून ठेवले होते. उत्तरणीय तपासणीसाठी शेळके यांचा मृतदेह पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. सायंकाळपर्यंत पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता.

उच्चस्तरीय चौकशीची मागणी

आरोग्याधिकारी डॉ. गणेश शेळके यांच्या आत्महत्या प्रकरणात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी केली आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button