breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

धक्कादायक! पक्ष्याचा जीव वाचवताना सी-लिंकवर झालेल्या अपघातात व्यावसायिकाचा मृत्यू

मुंबईः सी-लिंकवर झालेल्या अपघातात जीव गमावलेल्या उद्योजकांच्या कुटुंबीयांनी एक अनोखा निर्णय घेतला आहे. मागील आठवड्यात तरुण व्यावसायिक अमर जरीवाला यांचा सी-लिंकवर अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी एका टॅक्सी ड्रायव्हरला अटक करण्यात आली होती. मात्र, अमर यांच्या कुटुंबीयांनी अपघाताची केस न करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी विनंतीही त्यांनी मुंबई पोलिसांना केली आहे.

वांद्रे- वरळी सीलिंकवर मागील आठवड्यात एका पक्ष्याचा जीव वाचवत असताना अमर यांचा अपघात झाला. पक्षाने कारला धडक दिल्याचं अमर यांच्या लक्षात येताच त्यांनी ताबडतोब कार थांबवण्यासाठी ड्रायव्हरला सांगितलं होतं. त्याचवेळी एका वेगवान टॅक्सीने त्यांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अमर यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर टॅक्सी ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र, अमर यांच्या कुटुंबीयांनी टॅक्सी चालकाला माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, त्याच्यावरील गुन्हादेखील मागे घेण्यात येणार आहे. अमर हे पेशाने सीए होते. त्यांच्या मृत्यूचे कारणही भूतदया हेच होते. जीवदया आणि जैन संस्कारांचा पगडा होता. अमर जेव्हा देखील एखाद्या प्राण्याला संकटात पाहायचे तेव्हा ते तातडीने मदतीसाठी धाव घ्यायचे. लग्नाच्या वरातीतही ते घोड्यावर बसले नाहीत, अशी आठवण अमर यांच्या पत्नी रिना जरीवाला यांनी सांगितली आहे.

माफ करणे हे त्यांचा स्वभावच आहे. ते कधीच कोणाला उलटं उत्तर देत नसतं. अमर पावसाळ्यात कधीच लोणावळ्याला जात नसत. कारण, त्याकाळात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बेडूक फिरत असतात. आपल्या गाडीखाली घेऊन एखाद्या जीवाचा प्राण जाईल, ही कल्पनाच त्यांना सहन व्हायची नाही, असंही त्यांच्या पत्नीने सांगितलं. अमर यांच्या पश्चात त्यांचे आई- वडिल, पत्नी आणि दोन मुली आहेत. अमर यांच्या मुलींचा स्वभावही आपल्या वडिलांप्रमाणे आहे, असंही त्यांची पत्नी सांगते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button