ताज्या घडामोडीमुंबई

महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-राष्ट्रवादी युती; पवार-ठाकरेंमध्ये झाली चर्चा

मुंबई | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर भाजपच्या विविध नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने मनसे-भाजप या दोन पक्षांच्या संभाव्य युतीची चर्चा सुरू झाली आहे. अशातच आगामी निवडणुका एकत्र लढवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंही खलबतं सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील युतीबाबत चर्चा  झाल्याचे समजते. राज्य सरकारविरोधात आक्रमक झालेल्या भाजपला रोखण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत चर्चा सुरू असून अद्याप याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

 

युती झाल्यास कार्यकर्त्यांची मने जुळणार?
यंदा मुंबई, पुणे आणि नाशिकसह राज्यातील अनेक मोठ्या महानगरपालिकांची निवडणूक होणार आहे. या निवडणुका राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्रिपणे लढल्यास दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मने जुळणार का, यावर आता पक्षनेतृत्वाकडून अंदाज घेतला जात आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष पारंपरिकदृष्ट्या एकमेकांचे राजकीय विरोधक राहिले आहेत. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा संघर्षही झाला आहे. त्यामुळे युती झाल्यास दोन्ही पक्षांची मते एकमेकांकडे वळणार की नाही, याबाबत विचारमंथन सुरू असल्याचं समजते

काँग्रेस एकाकी?
नाना पटोले यांनी महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यापासून पक्षाने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिका निवडणुका आम्ही स्वबळावरच लढू, असं नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांनी याआधी अनेकदा स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसला वगळून युतीसाठी प्रयत्न सुरू केल्याचं समोर येत आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या मनसेने परप्रांतीयांबाबतची आपली भूमिका बदलल्यास त्यांच्यासोबत युती शक्य आहे, असं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांआधी राज्यात नेमकी काय राजकीय समीकरणे तयार होतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button